Saturday, December 21, 2024

/

समितीविरोधी काँग्रेस भाजप विरुद्ध आक्रोश: शिवसेनेकडून निषेध

 belgaum

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या महाराष्ट्रातील पक्षांनी सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पाठींबा देत समितीविरोधात उमेदवार थांबवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. याउलट काँग्रेस व भाजप या राष्ट्रीय पक्षातील महाराष्ट्राचे नेते समितीविरोधात प्रचारासाठी बेळगावात येत आहेत. त्यामुळे सीमाभागात तीव्र आक्रोश आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्या नेत्यांचा निषेध केला आहे.
आधी सीमावाद सोडवा नंतर प्रचाराला या अशी साद सीमाभागात घालण्यात येत आहे. सीमाभागातील मराठी जनता मराठी अस्मिता आणि संस्कृती जपत महाराष्ट्रात जाण्यासाठी अव्याहतपणे संघर्ष करत आहे. निवडणुका या सुध्दा लोकेच्छा दाखविण्यासाठीची चळवळीचीच पायरी आहे. सीमाभागातील जनता आपली लोकेच्छा दाखवण्यासाठी कर्नाटक विधानसभेची निवडणुका लढवत आहे. आशा वेळी समितीच्याच उमेदवारांविरोधात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण( काँग्रेस) व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी( भाजप) यासारखे प्रभावी नेते बेळगावात येऊन मराठी लोकांकडे आपल्या पक्षासाठी मतयाचना करत आहेत. त्यामुळे मराठी जनतेने या नेत्यांवर सीमावाद सोडविण्यासाठी कसा भरवसा ठेवायचा असा सवाल करत आहे.

शुक्रवारी दि ४ रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बेळगावात येणार असून दुपारी बारा वाजता बेळगाव दक्षिण मतदार संघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची सभा घेणार आहेत. सायंकाळी चार वाजता बेळगाव ग्रामीण आणि खानापूर येथे कॉंग्रेस उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. खानापूर तालुक्यातील काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर या अशोक चव्हाण यांच्या निकटवर्ती मानल्या जातात. नाते बघणार मी सीमावासीयांची भावना? हा प्रश्न जनता करत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याआधी खानापुरात सभा घेतली आहे. गुरुवारी दि ३ रोजी ते बेळगाव ग्रामीण मतदार संघात संध्याकाळी साडेसहा वाजता भाजपच्या उमेदवारासाठी सभा घेणार आहेत. राष्ट्रीय पक्षांच्या या दुटप्पी धोरणाबाबत सीमाभागात संताप व्यक्‍त होत आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या पक्षांचा आणि नेत्यांचा निषेध नोंदवला आहे. हे नेते सीमाप्रश्नाच्या विरोधात आहेत का असा सवाल करून त्यांनी दोन्ही पक्षांवर ताशेरे ओढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.