कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. काँग्रेस, भाजप, जेडीएस, छोटे अस्तित्व असलेला केजीपी आणि हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून आपले पाय पसरू इच्छिणारा महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष शिवसेना सारेच तयारीला लागले आहेत. विजयाची पताका आम्हीच राखणार असा दावा काँग्रेस करत आहे, भाजप देशपातळीवर जो विजय मिळतोय तोच कर्नाटकातही असा आत्मविश्वास व्यक्त करीत आहे तर जेडीएस ने या साऱ्यांची मात करून आपण सत्ताधीश होणार असा नारा दिला आहे, यावेळी किसका नंबर आयेगा? हे पाहावे लागणार आहे.
काँग्रेसने जयललिता फेम खिरापती वाटणारे सरकार कर्नाटकात चालवले, यातच कन्नड ध्वज आणि लिंगायत वीरशैव वाद निर्माण करून शेवटच्या सत्रात आपले महत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भाजपकडे पंतप्रधान मोदी, भ्रष्टाचार मुक्त प्रणाली व इतर कायमचे मुद्दे वगळता दुसरे सांगण्यासारखे नवीन काहीच नाही. अशा स्थितीत सर्व पक्षांची स्पर्धा त्रिशंकू अवस्था निर्माण करेल अशी शक्यता भल्या भल्या राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे, यामुळेच संपूर्ण देशाचे लक्ष कर्नाटकातील निवडणुकीकडे लागले आहे.
काहीही झाले तरी कर्नाटकात तिसऱ्या आघाडीचेच सरकार येणार असा होरा महत्वाच्या सर्वेक्षणांनी लावून धरला आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा आणि त्यांचे पुत्र कुमारस्वामी यांनी भाजप व काँग्रेस चा पाडाव करण्याचा चंग बांधला आहे, यामुळेच सर्वात शेवटी आपली उमेदवार निवड यादी जाहीर करणार असे या पक्षाने ठरवलेले दिसते, काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी तिकीट नाकारलेल्या उमेदवारांना आपलेसे करण्याचा राजकीय डाव यातून दिसत आहे, यामुळेच जेडीएस चे डावपेच दोन मोठ्या राजकीय पक्षांना मारक ठरतील अशी परिस्थिती आहे.
शिवसेना हा कर्नाटकात पूर्णपणे लहान पक्ष असला तरी भाजप मधील नाराज गटासाठी हा पक्ष सध्या आधारस्तंभ बनत आहे. भाजप मध्ये प्रत्येक मतदार संघात अनेक इच्छूक आहेत, सगळ्यांनाच आमदार व्हायचे आहे. आशा वातावरणात ज्याला उमेदवारी मिळेल तो सोडून बाकीचे नाराज होणार असून त्यांना शिवसेना आपलेसे करण्याच्या प्रयत्नात आहे, भाजपच्या राजकीय गणितांना सुरुंग लावण्यासाठी कर्नाटकात शिवसेनेने केलेला प्रवेश महत्वाचा ठरेल आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतांचे विभाजन होऊन भाजपला त्याचा मोठा फटका बसेल अशी शक्यताही निर्माण झाली आहे.
यंदाच्या कर्नाटक विधानसभेवरून काँग्रेस चे राष्ट्रीय पातळीवर भवितव्य ठरणार आहे. काँग्रेस ची सत्ता असलेल्या काही मोजक्या राज्यांपैकी कर्नाटक हे एक राज्य आहे, यामुळे येथील गड राखून ठेवता आला तरच देशासमोर दाखवण्यासाठी काँग्रेसकडे चेहरा असेल नाहीतर राजकारणातील सर्वात मोठी हार या पक्षाला पत्करावी लागणार आहे.