अनधिकृत कत्तलखान्याना आमदार फिरोज सेठ यांचा पाठींबा असून प्रशासन दबावाने कारवाई करण्याचे टाळत आहे असा आरोप करीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी कत्तल खान्यांना भेट दिली, मात्र कारवाईस पोलीस पुढे आले नाहीत यावेळी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी थेट कत्तल खान्यांना जाऊन पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरले. कारवाई केला नाहीत तर केंद्रीय गृह मंत्र्यांकडे तक्रारी देऊन तुमच्यावर कारवाई करू असा दम त्यांनी भरला आहे.
आज मेनका गांधी केएलई इस्पितळात कार्यक्रमासाठी आल्या आहेत. इंदिरा गांधींच्या या सुनेने बेळगावला येऊन सोनिया गांधींच्या भक्तांना मोठा दणका दिला आहे. अशी चर्चा राजकीय पातळीवर सुरू आहे.
खासदार सुरेश अंगडी यांनी बेळगावच्या ऑटो नगर येथील अनधिकृत कत्तलखान्या प्रकरणात उच्चस्तरिय चौकशीची मागणी केली आहे. येथे बांगलादेशी कामगार अनधिकृतपणे काम करत असल्याचा आरोप केला असून या साऱ्या बेकायदेशीर दरबाराला आमदार फिरोज शेठ हेच पाठींबा देत असल्याचा आरोपही केला आहे.
आज माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर,खासदार प्रह्लाद जोशी या कत्तल खान्यांना भेटी देऊन पाहणी करण्यास गेले होते. आमदाराच्या दबावाखालील पोलिसांनी योग्य चौकशी केली नाही. वारंवार तक्रार करून देखील तिथे काम करणाऱ्यांचे पासपोर्ट तपासले नाहीत. कमीतकमी ५० बांगलादेशी तेथे काम करत असून रामतीर्थ नगर येथील एक अपार्टमेंट मध्ये ते राहत आहेत. त्यांना हा अधिकार जुनी दिला ते भारताचे नागरिक आहेत काय? असे प्रश्नही भाजपने उचलले.
आमदार आणि त्यांचा भाऊ या प्रकरणात का हस्तक्षेप करत आहेत? याची पोलिसांनी दबावाखाली न येता चौकशी करावी अशी मागणी भाजप कडून करण्यात आली.
मेनका गांधी यांनी कत्तल खान्यातील सर्व मांसाचे सॅम्पल हैद्राबादला पाठवून द्या अशी सूचना केली आहे. परवानगी नसताना फक्त राजकीय शक्ती वापरून केली जात असलेली ही कत्तल चुकीची आहे. प्रशासन याला पाठीशी घालत असल्यास गय करणार नाही असे त्यांनी सुनावले आहे .
तेथून केएलई हॉस्पिटल ला गेल्यावरही जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि जिल्हा पंचायतीच्या सीईओ ना बोलावून घेऊन त्यांनी सुनावले असून कारवाई करून अहवाल द्या नाहीतर सोडणार नाही असा इशारा दिला आहे.