१२ मे रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणता पक्ष कोणत्या मतदार संघात कोणाला उमेदवारी देणार? असा प्रश्न लोकांना पडला असून त्याची उत्सुकता फार आहे. मागील निवडणुकीपेक्षा यंदा उमेदवार निवडीवरून राष्ट्रीय पक्षांवरील दबाव फार आहे. आम्ही सांगतो त्यालाच उमेदवार करा अशी मागणी यंदा प्रत्येक मतदार संघात होत असल्याने वातातवरण तापत आहे. आता पक्ष कुणाचे ऐकणार हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल व त्यावरच भवितव्यही ठरणार आहे.
बेळगाव ग्रामीण मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांची उमेदवारी पक्षाने केंव्हाच जाहीर केली आहे. मात्र त्यांना विरोध करणार गट अजूनही कामात आहे, पक्षातील काही प्रबळ नेत्यांनी हेब्बाळकर यांना उमेदवारी दिल्यास दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देतो अशी धमकीच देऊन टाकली आहे. यामुळे या मतदार संघात काँग्रेस मधील लाथाळ्या आणि बंडाळ्या दिसून येत आहेत. भाजपने यंदा या मतदार संघात उमेदवार चेहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे समजत असताना अजून काहीच स्पष्ट केलेलं नाही.
खानापूर मतदार संघातही काँग्रेस तर्फे अंजलीताई निंबाळकर यांचे तिकीट निश्चित असे बोलले जात असताना त्यांना पक्षाच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांचा विरोध आहे. भाजपचे प्रबळ दावेदार प्रल्हाद रेमाणी यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे तिकीट कोणाला हे नक्की झालेले नाही यामुळे तेथेही रस्सीखेच सुरू आहे.
बेळगाव उत्तर मतदार संघात भाजपचे असंख्य इच्छूक आहेत, त्यापैकी कुणाचे पारडे जड होणार आणि कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे स्पष्ट नाही. यातच काँग्रेस पक्षात मुसलमान समाजाने निवडलेल्या भूमिकेने वादळ निर्माण झाले आहे. फिरोज सेठ यांना उमेदवारी दिली जाऊ नये ही मागणी मुस्लिम फोरम व इतर पक्षांनी चालू ठेवली असल्याने पक्ष कोणता निर्णय घेतो याकडे लक्ष आहे.
बेळगाव दक्षिण मध्ये काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षात उमेदवार निवडीवरून वाद सुरू आहेत. काँग्रेस पक्षाने या मतदार संघात विणकर जास्त आहेत म्हणून विणकर नेते असलेल्या एम डी लक्ष्मीनारायण यांना पुढे केले असून याला स्थानिक काँग्रेस नेत्यांचा विरोध आहे. तर भाजप मध्ये दहा ते बारा जणांच्या नाराज गटाने अभय पाटील यांना उमेदवारी देऊ नये असा लकडा आपल्या पक्षाकडे लावला आहे.
यापूर्वी च्या निवडणुकी पेक्षा यंदा उमेदवारी साठीच भांडणे लागण्याची परिस्थिती जास्त आहे, यामुळे राष्ट्रीय पक्षातील अंतर्गत वाद , आरोप प्रत्यारोप व मारामाऱ्या वाढल्या आहेत, विरुद्ध पक्षातील मंडळींचे काम त्या त्या पक्षातील लोकच करू लागले असल्याने उमेदवार निवड होईपर्यंत पोलीस दलाला डोळ्यात तेल घालून राहावे लागेल.
सगळे भांडण करा आणि एम ए समिती ला विजयी करा.