राष्ट्रीय पक्षात गेले की काय होते? तर मराठीची तुडवणूक होते हे रविवारी अनगोळच्या रामनाथ मंगल कार्यालयात झालेल्या दुर्दैवी घटनेतून सिद्ध झाले. भाजप मधील वादात एकाने इतर दोघांना तुडवले, त्यापैकी एकाने मारहाण करणाऱ्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली. तर दुसर्याने तितकेच मार खाऊनही शांत राहण्याचा निर्णय घेतला. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ त्या मराठी भाजप नेत्यावर का आली? याचा विचार राष्ट्रीय पक्षांच्या नादाला लागणाऱ्या तरुणांनी करावा.
त्या घटनेत पांडुरंग धोत्रे व सुनील चौगुले यांना एकाच वेळी मारण्यात आले. कानफटात मारल्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांना खाली पाडवून तुडवले, अंगावरील कपडेही फाडले. धोत्रे ही घटना तक्रार करून माध्यमांसमोर सांगून मोकळे झाले. पण चौगुले यांचा आवाज दाबला गेला. आपण मार खाल्ला याचा त्यांना अपमान वाटला की तक्रार करून ते उघड केल्यावर आणखी मार खावा लागेल याची भीती वाटली? की तू तोंड उघडू नकोस असा दबाव त्यांच्यावर होता?
ही अवस्था अपमानाची आहे. मराठी लोकांना सामावून घेऊन निवडून येत राहिलेल्या राष्ट्रीय पक्षांनी बेळगावच्या मराठी लोकांची ही अवस्था केली आहे. आणि आता धड मराठी माणसे जवळ करत नाहीत व राष्ट्रीय पक्षात काडीची किंमत नाही हेच दिसते.
धोत्रे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला यामुळे त्यांचा विणकर समाज मारेकरीवर कारवाई करा या मागणीसाठी रस्त्यावर उतरला, सुनील चौगुले यांना मराठी समाज पाठींबा देणे शक्य नाही. निवडक आणि असेच त्या पक्षात गेलेले व तोंड दाबून बुक्के सोसणारेही त्यांना तक्रार करण्यास तयार करू शकले नाहीत, ही शोकांतिका आहे. भिऊ नकोस म्हणून सगळेच त्यांच्या पाठीमागे थांबले, बरोबर कोण नाही हे सुद्धा दिसले आहे.
यापुढे अन्याय सहन करून मूग गिळलेला एक राष्ट्रीय पक्षातील मराठी बिनलढाऊ कमकुवत प्रतिनिधी म्हणून त्यांना ओळखले जाणार आहे, आपलीही हीच अवस्था होऊ नये म्हणून आता मराठी तरुणांनी अशा घटनांतून बोध घ्यावा लागेल.
याच पक्षाने निवडणुकीचे तिकीट देताना राबलेल्या मराठी उमेदवारांना डावलले आहे. पैसे खर्च करायला लावून ऐन निवडणुकीत बाजूला फेकले आहे. कन्नड लोक मराठी माणसाचे शत्रू नाहीत, इतरवेळी सगळे एकच असतात, पण वर्चस्वाची वेळ आली की संधी न देता ही दरी वाढवली जाते, मराठीला दुजाभाव दिला जातो, पण आवाज उठवलो तर पक्ष कारवाई करेल, घरात अपमान होईल अशी कारणे सांगून मराठी माणूस मागे हटला, हे दुर्दैव आहे.