मी नेहमी प्रमाणे घटप्रभाहुन ऑफिसचे काम आटोपून घरी आले होते.घरी चहापाणी झाल्यावर घरातील साफसफाई ,स्वयंपाक आदी कामात गुंतली होत्ते.तेव्हढ्यात मोबाईल वाजला.आमच्या ऑफिसमधील कर्मचारी महिलेने फोन केला होता.तिने सांगितले की,सितव्वा तुम्हाला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी सांगितली जात आहे.लवकर टी व्ही सुरु करा आणि बघा.गडबडीने टी व्ही सुरु केला आणि पाहिले तर मला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी अनेक चॅनेलवर सांगितली जात होती.मला तर बातमी ऐकून आणि बघून आश्चर्याचा धक्काच बसला.मी एव्हढे मोठे कार्य केले आहे असे मला आजही वाटत नाही.मी पुरस्कारासाठी अर्जही केला नव्हता.पद्मश्री पुरस्कार हा माझ्या बरोबर कार्य करणाऱ्या चार हजारहून अधिक महिलांचा आहे.या महिलांच्या कार्याचा हा गौरव आहे असे मला वाटते,असे उदगार अलीकडेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या सीतव्वा जोडट्टी यांनी काढले.देवदासी प्रथेचे निर्मूलन करून देवदासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे,आरोग्य सुविधा मिळवण्यात यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन पद्मश्री त्यांना जाहीर करण्यात आलाय . बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील कब्बूर हे त्यांचे गाव पण सध्या त्यांची कर्मभूमी बनले आहे घटप्रभा हे गाव . महिला कल्याण आणि रक्षण संस्था (महिला अभिवृद्धी मत्तु संरक्षण संस्थे अर्थात मास ही संस्था ) घटप्रभा येथे असून या संस्थेच्या मार्फत सीतव्वा यांचे कार्य चालले आहे . ४८०० महिला त्याच्या सदस्य असून संस्थेत कार्य करणाऱ्या कर्मचारी देखील पूर्वाश्रमीच्या देवदासीच आहेत .
सीतव्वा यांचा वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातला आजवरचा प्रवास संघर्षमय आणि काट्याकुट्यानी भरलेल्या मार्गावरूनच करावा लागलाय . आता जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार म्हणजे सीतव्वा सारख्या व्यक्तिमत्वाला दीर्घकाळ कार्य करण्यासाठी आणि संघर्ष करण्यासाठी ऊर्जा देणारा आहे . वयाच्या सातव्या वर्षी देवदासी होण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढवला.देवदासीचे जीवन काय असते याचा अनुभव त्यांनी घेतला असून एकही महिला देवदासी होऊ नये अशी आपली इच्छा असल्याचे त्या सांगतात.एकूण नऊ मुलांपैकी सीतव्वा याना पालकांनी देवदासी म्हणजे देवाला सोडण्याचे ठरवले . देवदासींचे भोग काय असतात हे त्यांनी अनुभवले आहे . त्यामुळेच सरकारकडून जेव्हा देवदासी प्रथेविरोधात कार्य करण्यासाठी विचारणा झाली त्यावेळी त्या स्वतः तर तयार झाल्याच शिवाय आपल्या परिघातील देवदासी महिलांनाही जागृत करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले . त्यांच्या कार्यामुळे आज ४८०० महिलांना देवदासी प्रथेतून मुक्तता मिळाली असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसामान्य स्त्री प्रमाणे तिनेही जीवन जगावे यासाठी सीतव्वा संघर्ष आणि कार्य करत आहेत .
१९९१ मध्ये कर्नाटक राज्य महिला कल्याण निगमच्या माध्यमातून सीतव्वा यांचे कार्य सुरु झाले . एच आय व्ही आणि देवदासी यांच्यासाठी त्यांचे कार्य सुरु झाले . देवदासी प्रथेमधून बाहेर या . तसेच देवदासी प्रथे विरोधात जागरूकता निर्माण करा . तुम्ही कोणता उद्योग करू इच्छिता त्यासाठी मदत करू असे आश्वासन निगमकडून त्यांना देण्यात आले . उदबत्ती ,मेणबत्ती ,मडकी तयार करणे ,शिवणकाम करण्याचे प्रशिक्षण बऱ्याच महिलांना देण्यात आले आणि त्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने समाजात जगण्याची संधी मिळाली . यावेळी सीतव्वा केवळ सतरा वर्षाच्या होत्या . मोलमजुरीचे काम त्या इतर देवदासी प्रमाणे करत होत्या . १९९६ मध्ये स्वयंसेवक म्हणून कार्य करण्यास प्रारंभ केला .
१९९७ मध्ये मास संस्थेची स्थापना केली . तेव्हा आम्हाला थोडे धाडस आले . मग गावोगावच्या जत्रेत देवदासी प्रथे विरोधात,आरोग्याबाबत आणि एच आय व्ही विषयी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य आपल्या सहकाऱ्या समवेत सुरु केले . यावेळी यल्लम्मा डोंगरावर पुजारी मंडळींकडून धमक्या देण्यात आल्या .पण न डगमगता धीराने तोंड देऊन आमचे कार्य सुरूच ठेवले . नंतर आम्हाला होणारा विरोध मावळत गेला आणि विरोध करणाऱ्या व्यक्तींनीच आमच्या कार्याला पाठिंबा दिला . मी पुरस्कार मिळावा म्हणून कार्य केले नाही . आम्हाला ज्या वेदना सहन कराव्या लागल्यात ,आम्हाला जो त्रास भोगावा लागलाय तो इतरांना भोगावा लागू नये हीच माझी तळमळ आहे . ऐरावती मांग आमच्या अध्यक्षा रेखा भंडारी यांच्यासोबत मलाही लीडरशिप ट्रेनिंग मिळाले . त्या दोघींचाही संस्थेच्या कार्यात सिंहाचा वाटा आहे . सुरुवातीच्या काळात जत्रेमध्ये फिरायचे आणि लोकांकडून देणगी गोळा करत होतो . फक्त एक रुपया देणगी द्या असे म्हणून लोकांकडून देणगी गोळा केली . नंतर आमचे कार्य बघून अनेक संस्थांनी मदत करण्यास सुरुवात केली . बेळगाव जिल्ह्यातील दहा तालुक्यात देवदासी प्रथा निर्मूलनाचे कार्य आमच्या संस्थेचे सुरु आहे . चिकोडी ,अथणी आणि रायबाग तालुक्यात देवदासींच्या मुलांच्या शिक्षणासाठी आमचे कार्य सुरु आहे ,असे सीतव्वा यांनी आपल्या कार्याची माहिती देताना सांगितले .
- पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यामुळे माझी आणि संस्थेची जबाबदारी अधिकच वाढले . सध्या सरकारने दहा एकर जमीन आमच्या संस्थेला दिली आहे . या जागेत इमारत बांधून कार्यालय सुरु करणार आहे . अनाथ मुलांसाठी वसतीगृह ,वय झालेल्या देवदासीसाठी राहण्याची सोय,विविध तऱ्हेचे प्रशिक्षण देण्याची सुविधा आम्ही दहा एकर मिळालेल्या जागेत सुरु करणार आहोत . देवदासींची मुले आज शिक्षण घेत आहेत . शिक्षण पूर्ण झालेली अनेक मुले मोलमजुरीची कामं करत आहेत . त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे रोजगाराची संधी मिळाली पाहिजे . समाजाला आज आमच्या संस्थेच्या कार्याचा अभिमान वाटतो हे बघून समाधान वाटते . समाजानेच आमच्या संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तर आम्ही भविष्यात अधिक चांगले कार्य करू याची खात्री वाटते असा आशावादही सीतव्वा जोडट्टी यांनी व्यक्त केला .
- बातमी सौजन्य-विलास अध्यापक
- ए बी पी माझा बेळगाव