बेळगाव सीमाभागात मराठी युवाशक्ती जागी झाली आहे. या शक्तीने विखुरलेल्या महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. आता येत्या निवडणुकीत प्रत्येकानेच हेकेखोरपणा सोडून समितीचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणण्यावर भर द्यावा लागणार आहे.
आपला भारत देश जास्त युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. कोणत्याही प्रश्नात नेट लावायचा असेल तर उपयोगाला येतात ते युवकच, अशावेळी सीमाप्रश्नाची नौका जर तारून न्यायची असेल तर युवकच कामाला येणार आहेत हे नक्की आहे. समितीत मागील पिढीच्या युवकांनी काम केले नाही असे नाही पण आत्ता ते युवक राहिले नाहीत आणि ज्येष्ठ होण्याच्या वाटचालीत एकमेकांवर कुरघोड्या करत करत ते एकमेकांचे दुष्मन होऊन बसलेत. या दुष्मनीतून झालेल्या बेकीने समिती आणि सीमाप्रश्नाचे हाल आणि नुकसान फार झाले आहे, अशा काळात याच पिढीचे उत्तराधिकारी युवक स्वतः होऊन जागे झाले आणि त्यांनी स्वतः मशाल हातात घेऊन एकीचे स्वप्न पाहिले हे स्वागतार्ह आहे.
एक धोकाही आहे, या जागृत मात्र उत्साही तरुणांची ढाल पुढे करून मागच्या पिढीकडून आपला स्वार्थ साधून घेतला जाईल याचा. जागृत तरुणाईने कुणाचीही तळी उचलून न धरता आणि कुणाही नेत्याची भलावण किंवा विरोध न करता हे आव्हान पेलावे लागेल, अन्यथा हा याचा आणि तो त्याचा असे होऊन कधी युवा मंडळीत फूट पाडली जाईल सांगता येत नाही.
या एकत्र येत असलेल्या तरुणांनी एक नियम लक्षात ठेवावा, आपसात मतभेद होऊ देणार नाही, हे लक्षात घ्यावे, या युवा समूहात पदाधिकारी किंवा अध्यक्ष, उपाध्यक्षाची भानगड नसावी. नाहीतर वर्चस्वाचा वाद निर्माण होण्याचा धोका आहे. आपण आपले आणि परके अशा कुणाकडूनच वापरले जाणार नाही अशी खूणगाठ बांधूनच काम व्हायला पाहिजे.
समितीच्या लढ्यातून युवक बाजूला पडलेत अशी बोंब ठोकणाऱ्यांना मात्र आता या युवकांनी पाणी पाजले आहे. आपले नेते आपलेच आहेत त्यांना उगाच बदनाम न करता आणि त्यांनी आपापल्या परीने दिलेल्या योगदानाचे भान ठेवून युवकांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास त्यांना यश मिळणार हे नक्की.