Saturday, December 21, 2024

/

कावीळ-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

कावीळ होणे अर्थात रक्तातील बिलीरूबीन नावाच्या रंगद्रव्यात लक्षणीय वाढ होऊन त्वचा,डोळ्यातील पांढरा भाग, नखे पिवळट दिसू लागणे होण. शरीरातील काही स्राव तसेच काही पेशीसमूहही पिवळे होतात. परंतु मेंदूपर्यंत हे रक्तद्रव्य जात नसल्याने मेंदूला काही इजा पोहोचत नाही.(फक्त नवजात बालकांमध्ये हे रक्तद्रव्य मेंदूपर्यंत पोहोचू शकते.)
कावीळ कशी होते?
1. रक्ताचे अतिरिक्त विघटन झाल्यामुळे.
2. यकृतातील बिलीरूबीनचे वहन बिघडल्यामुळे
3. यकृतपेशी खराब झाल्यामुळे
4. यकृतात पित्त साठून राहिल्यामुळे
यकृत पेशींची हानी होऊन त्या फुगल्यासारख्या होतात. काही पेशी पूर्णतः मृत होऊन आक्रसून आकुंचन पावतात. इतर पेशी सुजल्यामुळे यकृतालाही सूज येते.
कारणे- 1. सर्वसामान्यतः पुष्कळ वेळा विषाणू व काही विशिष्ट जीवाणुंमुळे कावीळ होते. (उदा. हिपॅटायसीस ए, बी, सी, ई. डेल्टा व्हायरस, लेप्टोस्पाईरा जीवाणू, टॉक्झोप्लाझ्मा जीवाणू इ.)
2. औषध द्रव्यांमुळे उदा. अल्कोहोल, इथेनॉलमुळे शिवाय रिफॅम्पॅसीन, आयसोनियाझीड, सिमॅटीडीन अशा औषधांमुळे कावीळ होऊ शकते.
3. विषद्रव्यांमुळे उदा. काही विशिष्ट अळंबी व कार्बन टेट्राक्लोराईड यामुळे यकृतपेशींना धोका असतो.
लक्षणे- विषाणू व जीवाणूमुळे होणार्‍या काविळीची पाण्यातून व खाण्यातून लागण होते व हा एक साथीचा रोग समजला जातो. अस्वच्छतेमुळे फार लवकर फैलावतो. ए, सी आणि ई (प्रकारचा यकृतदाह) किंवा या प्रकारची कावीळ पाण्यातून व खाण्यातून फैलावू शकते तर हिपॅटायटीस बी या प्रकारची कावीळ संसर्ग झालेल्या रक्तांतूनच पसरते. उदा. दूषित रक्त दिल्याने किंवा दूषित सुयांपासून संसर्गीत स्त्री- पुरूष संबंधातून फैलावते. साधारण थंडी वाजून येणे, डोके व अंग दुखणे, भूक मंदावणे, मळमळ, उलटीची भावना होणे, क्वचित उलट्या व जुलाब होणे, पोटात दुखणे, अपचन होणे आढळते. तपासणीमध्ये डोळ्यातील पांढरा भाग, नखे, त्वचा पिवळट दिसतात. यकृताला सूज आढळते. प्लीहेलासुध्दा सूज येते. कित्येकदा गळ्यात गाठी येतात. लघवी पिवळी होते. हिपॅटायटीस बीमध्ये सांधेही दुखतात. इतर काविळीतसुध्दा अंगाला खाज येते. खूप झोप येते. जशी कावीळ वाढेल तशी लघवी दाट पिवळी होते, शौचाला पांढरट होते. ग्लानी यायला लागते. अरूची वाढते. 3 ते 6 आठवड्यात रूग्ण पुन्हा पूर्ववत होतो.
होमिओपॅथी- बारा वर्षाचा ’यश’ अगदी अशक्त झाला होता. रक्त तपासणीत काविळीचा अंश सापडला होता. त्याला त्रासदायक खोकला होता. शौचाला पांढरच व्हायचे. त्वचा अगदीच फिकट पिवळसर दिसायची. यकृताला खूज होती, सारखं पोट रिकामंच आहे असं वाटायचं. थंड हवेत बरं वाटायचं. झोपल्यावर पोटदुखी वाढायची. गरम पदार्थांना त्रास व्हायचा. गार पाणी प्यावेसे वाटायचे. पण असं पाणी पिल्यावर उलटी व्हायची. यावर एक विशिष्ट औषध दिल्यावर 4-5 दिवसातच ’यश’ पूर्ववत झाला. होमिओपॅथीमध्ये अनेक औषधं काविळीवर उपलब्ध आहेत. उदा. चामोमिला, चोलीडोनियम, लायकोपोडियम, पोडोफायलम, डिजीटॅलीस, नक्स वोमिका, फॉस्फरस इ. परंतु विशिष्ट लक्षणांवर विशिष्ट औषधच वापरावे लागते. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
निसर्गोपचार
मुळ्याची  पाने- मुळ्याच्या हिरव्या पानांचा रस काढावा. तो स्वच्छ कपड्यातून गाळावा. मोठ्यांना अडीच कप व लहानांना दीड कप रस प्यायला द्यावा. पोट साफ राहून भूक चांगली लागते व आठ दिवसात काविळीची लक्षणे कमी होतात.
पडवळ- पडवळांची 15 ग्रॅम वाळलेली पाने घेऊन दीड कप उकळते पाणी घालून काढा तयार करावा. त्यानंतर 500 मि. ली. पाण्यात धने घालून चांगले उकळावे. पडवळाच्या पानाचा काढा व धन्याचे पाणी एकत्र करून दिवसांतून पाव ते अर्धा कप तीनदा रूग्णाला द्यावे.
बिटर लुफ्फा- याचा रस काविळीवर परिणामकारक औषध आहे. याच्या बिया बाजारात मिळतात. त्या पाण्यात चोळून त्याचा रस काढावा याचे दोन- तीन थेंब रूग्णाच्या नाकात सोडावेत. हे औषध कडक असल्यामुळे जरा गरगरते. परंतु ताबडतोब आराम मिळतो.
उसाचा रस- एक पेला ऊसाचा रस व अर्ध्या लिंबाचा रस खूप उपयोगी आहे. परंतु ऊसाचा रस घरीच काढावा. कारण बाहेरचा पिल्याने अस्वच्छतेमुळे जास्त त्रासाचा संभव असतो.
बाराक्षार
1. नॅट्रम सल्फ- तोंड कडू होणे, पोटात जडपणा, कळा येणे, पिवळट रंगाचे जिभेवर किटण असणे, यावर उपयुक्त.
2. कालीमूर- शौचाला पांढरट, जिभेवर पांढरा थर, पाठीत व पोटात दुखणे यावर अगदी खास औषध.
आहार- विषाणूमुळे झालेली सौम्य स्वरूपाची कावीळ योग्य आहार व विश्रांती या दोन उपायांनी लवकर बरी होते. यकृताची बिघडलेली यंत्रणा पूर्ववत होण्याची गरज असते. काविळीची तीव्र लक्षणे कमी येण्यासाठी पूर्ण विश्रांती आवश्यक असते. रूग्णाला ताजी रसाळ फळं चावून खाण्यास द्यावी. कमी तेल- तूप असलेले साधे तसेच कर्बोदकांचे प्रमाण जास्त असलेले जेवण द्यावे. पोटाला जड अशा डाळी व कडधान्ये आहारातून तात्कालिक वर्ज्य करावी. अन्नपचनासाठी यकृतावर अतिरिक्त वर्ज्य करावी. अन्नपचनासाठी यकृतावर अतिरिक्त ताण पडणार नाही असे पहावे. घरगुती अन्नच घ्यावे. पाणी उकळून गार करून प्यावे.
काविळीसाठी लसीकरण उपलब्ध आहे. त्याचा योग्य उपयोग करून घ्यावा. यकृत हा एकच असा अवयव आहे ज्याच्या पेशी नष्ट झाल्या तरी पुन्हा नव्याने तयार होऊ शकतात.

Dr sonali sarnobatडॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक -९९१६१०६८९६
सरनोबत क्लिनिक- ९९६४९४६९१८

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.