सीमाप्रश्न हा सीमाभागातील प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय….. हा विषय प्रत्येकाच्याच मनात दिवस रात्र तडफड निर्माण करतोय, ही तडफड जेंव्हा विचार करायला लावते तेंव्हा, आपसूकच प्रतिक्रिया बाहेर पडतात. बघा नेत्यांनाही चिंतन करायला लावणारी ही परखड प्रतिक्रिया…..
”अहो नेतोबा कशाला करताय शोभा हे वागणं बरं न्हवं”
मी आज युवकांच्या मनातील लिहतोय, जेष्ठाना उपदेश करावा इतके काय आम्ही मोठे नाही, त्यांचे सीमाप्रश्नाबद्दल कर्तृत्व मोठे त्याग मोठा, तळमळीबद्दल तर शंकाच नाही . पण तुमचा हट्ट नडतोय सीमाभागाला, मुळात हट्ट करण्याचा अधिकार आम्हा लहानग्यांना आहे आणि तो पुरविण्याचा तुमचा, पण इथे तर….असो.
इतके दिवस म्हंटले जायचे कि हा लढा फक्त वयोवृद्धांचा झालाय युवक समिती पासून लांब जातोय, पण मागील 10 वर्षात युवकांची संख्या लक्षणीय आहे ते लढा खांद्यावर घ्यायला सक्षम झालेत आणि त्यांचीही हीच इच्छा आहे कि आपण लवकरात लवकर महाराष्ट्रात जाऊ. त्यासाठी समितीने आम्हाला कार्यक्रम द्यावेत ,प्रेरणा द्यावी इतकीच माफक अपेक्षा असते, पण असे होणार नाही कारण तुम्हाला सवड कुठे आहे युवकांकडे लक्ष द्यायला, तुमचे चालू आहे “बेकी एक्के बेकी”! आणि ती सवतीचीच पोरं कशी आहेत आणि गद्दार कशी आहेत एवढंच पटवून द्यायला तुम्हाला वेळ आहे.
एक स्पष्ट करतो कि आम्ही कोणत्याही गटाचे नाही. ना दळवी गटाचे ना ठाकूर ना किणेकर गटाचे तर आम्ही फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीचे पाईक आहोत.
येत्या काळात निवडणुका होणार आहेत जर प्रत्येक ठिकाणी एकच उमेदवार उभा केला तरंच आपल्या पदरी विजय आहे. पण जर मागील प्रमाणे पुन्हा बेकीची नांदी झाली तर पराभव अटळ आहे.
म्हणून नेत्यांना हात जोडून विनंती राहील वेळीच सावध व्हा नाहितर निवडणुकीत भाग घेऊच नका.
या सगळ्या प्रकारात फक्त सीमाप्रश्नाचे आणि मराठी भाषिकांचे नुकसान होतय हे नक्की.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे माननीय अध्यक्ष श्री दिपक दळवी यांना आमची विनंती राहील झाले गेले विसरुन जाऊन तुम्ही सर्व घटक समिती मध्ये आणि नेत्यांमध्ये एकोपा घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. तुम्हीही तुमच्या पदाचा मान राखून निःपक्षपाती आणि सर्वांना एकत्र घेऊन लढावे तुमच्या सर्वांच्यात जरी वैचारिक मतभेद असले तरीही सीमाप्रश्नाचा एक दुवा एकत्र येण्यासाठी पुरेसा आहे असे वाटते.
आणि तरीही असेच चालू राहिले तर आम्हा युवकांना वेगळा विचार करावा लागेल, जेष्ठांविरूद्ध दंड थोपटावे लागतील. कृपया आम्हाला गृहीत धरले जाऊ नये.
आज आपल्या या बेकीचा विरोधक व्यवस्थित फायदा घेताना दिसतात. विकासाच्या, हिंदुत्वाच्या आणि पदाच्या हव्यासात आपल्या युवावर्गाला ते आकर्षित करून घेत आहेत, ते रोखायचे असेल तर एकी हा एकच पर्याय आहे.
जर एकीसाठी प्रयत्न झाले नाहीत तर येत्या काळात सीमावासियांचे थोर नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब यांच्या घरासमोर आम्ही उपोषणाचा इशारा देत आहोत. त्यानीच आता आम्हाला न्याय दिला पाहिजे.
पोटतिडकीने भावना मांडतोय या फक्त माझ्या एकट्याच्या नसून समस्त युवकांच्या आणि समिती प्रेमी सीमावासियांच्या आहेत तरी भावना समजून घ्याव्यात.
कळावे
श्रीकांत कदम
म.ए. समिती कार्यकर्ता.
जय महाराष्ट्र