Saturday, December 21, 2024

/

मुखदुर्गंधी- वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

मुखदुर्गंधी किंवा तोंडाला खराब वास येणे हा विकार बर्‍याच व्यक्तीमध्ये आढळतो. दुर्दैवाने या व्यक्तिंना स्वतःला ह्या गोष्टीची बर्‍याचदा जाणीव नसते आणि त्यांना हे सांगायचे कसे हा त्यांच्या संगतीतल्या माणसांपुढे प्रश्न असतो.
कारणे आणि लक्षणे-
मुखदुर्गंधीचे प्रमुख कारण म्हणजे रोगट हिरड्या. बर्‍याचवेळा दाताला लागलेली कीड त्यांच्या मुळापर्यंत पोहोचलेली असते. त्यामुळे हिरड्यावरही या किडीचा प्रादुर्भाव होऊन हिरड्यांवर व्रण किंवा फोड येतात. त्यात जंतूंचा शिरकाव होऊन दुर्गंधीयुक्त पू तयार होतो. आणि तोंडाला खराब वास येतो. दातांमध्ये किडीने बारीक छिद्र पाडले की जंतूंच्या वाढीला पोषक वातावरण मिळून जंतूंची संख्या अमर्याद वाढते आणि त्यातून वाईट वास येतो.
नाक, घसा, श्वसनमार्ग किंवा पोट यांना जंतूसंसर्ग झाला असला तरी खराब वास येतो. काही वेळा जुनाट टॉन्सीलचे दुखणे किंवा श्वास नलिकेचा दाह (ब्रॉकायटीस) बर्‍याच वर्षांचा सर्दीचा त्रास या कारणांनी घशाच्या मागच्या बाजूने गळ्यात चिकट स्राव येत राहातो, तसेच अपचन, बिघडलेले पोट, मलावरोध इ, कारणांनीही तोंडाला खराब वास येतो.
उपचार- मुखदुर्गंधीच्या कारणाप्रमाणे उपचार करावे लागतात.
होमिओपॅथी- अठ्ठावीस वर्षाची हेमा सरकारी इस्पिळात सोल वर्कर म्हणून काम करायची. त्यामुळे तिला अनेक रूग्णांशी भेटण्याचा प्रसंग यायचा. व्यक्तिमत्व आकर्षक असूनसुध्दा हेमाच्या तोंडाला खराब वास यायचा. त्यामुळे रूग्णांशी किंवा रूग्णांच्या नातेवाईकांशी बोलताना हेमाला एक न्यूनगंड वाटायचा. तिला त्यांच्याशी आत्मविश्वासपूर्वक बोलायला संकोच वाटायचा. तिने भीतभीतच ही समस्या होमिओपॅथीने दूर होईल का असे विचारले. तपासून पाहिले असता हिरडयांना बरीच सूज होती. हिरड्या लालभडक झाल्या होत्या. शिवाय काही ठिकाणाहून रक्तही येत होते. यावरचे औषध फक्त पंधरा दिवस घेतल्याने हेमाचा त्रास बंद झाला. आता ती संपूर्ण आत्मविश्वासाने आपले काम करून शकते.
हेक्ला लावा, मर्कसॉल, क्रिओसोट, लॅकेसीस अशी अनेक औषधे मुखदुर्गंधीवर विविधरित्या उपयोगी आहेत. त्यांचा कारणपरत्वे व लक्षणानुसार वापर करावा लागतो.
निसर्गोपचार- मुखदुर्गंधीसाठी अनेक घरगुती उपचार आहेत. परंतु मेथ्यांचा काढा हा अधिक उपयोगी पडतो. एक लहान चमचाभर मेथ्या अर्धा लिटर पाण्यात घालाव्या. 15 मिनिटे मंद विस्तवावर हे पाणी उकळवावे. थोडा वेळ ठेवून मग ते गाळावे आणि चहासारखे प्यावे. हा काढा नियमित प्याल्याने तोंडाचा वास कमी होतो. पोेटातील अन्न अजीर्ण होऊन मुखदुर्गंधी येत असल्यास त्यावर नापती हे फळ अत्यंत गुणकारी आहे. पचनाची क्रिया सुधारण्यास मदत करणार्‍या या फळाच्या सेवनाने मुखदुर्गंधी कमी होते. कच्चा पेरू चावून खाल्याने दातांना आणि हिरड्यांना चांगला व्यायाम होतो. पेरूमध्ये टॅनिक, मॅलिक, ऑक्झॅलिक आणि फॉस्फरस आम्ले तसेच कॅल्शीयम ऑक्झालेट व मँगनीज हे क्षार असतात. तसेच पेरूच्या झाडाची कोवळी पाने खाल्याने हिरड्यांतू रक्त येणे थांबते आणि दुर्गंधी कमी होते. अजमोदा नावाची कोथिंबीरीसारखी वनस्पतीची पाने कुटून लवंग घालून पाण्यात उकळवावे. या काढ्याने गुळण्या कराव्यात. मुखशुध्दी होते.
बाराक्षार- फेरम फॉस 6ु व कालीमूर 6ु यांचे मिश्रण उपयोगी आहे.
आहार- संतुलीत आहार घ्यावा. भाज्या, फळे, सुका मेवा, कडधान्ये आदींचा समावेश करावा. बध्दकोष्ठतेचा त्रास असणार्‍यांनी साखर, कर्बोदके, मैद्याचे पदार्थ, मांस, अंडी, मासे टाळावेत.
इतर उपाय- दिवसातून दोन वेळा दात स्वच्छ घासावेत. विशेषतः मांसाहार केला असल्यास मांसाचे बारीक कण डेंटल फ्लॉसने स्वच्छ करावेत. दात किडले असल्यास, हिरडयातून रक्त येत असल्यास दंतवैद्याचा सल्ला घ्यावा. जेवणानंतर पेरू किंवा सफरचंद खावे. हिरड्यांना नियमित त्रिफळा चूर्णाने मालिश करावी कडुनिंबाच्या डहाळीने दात स्वच्छ करावेत. गरम पाण्याने नियमित गुळण्या कराव्यात.sonali sarnobat

डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक -९९१६१०६८९६
सरनोबत क्लिनिक- ९९६४९४६९१८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.