डांग्या खोकला, माकड खोकला किंवा वैद्यकीय भाषेत ज्याला परट्युसीस असे म्हणतात हा एक संसर्गजन्य आजार आहे. एक वर्षाच्या आतील मुलांना तसेच पाच वर्षापर्यंतच्या बालकांना बहुधा या रोगाचा संसर्ग होतो. काही वेळा बारा वर्षापर्यंतच्या मुलांमध्येही दिसून येतो. उपचार वेळेवर झाले नाहीत तर फुफ्फुसामध्ये गंभीर बिघाड होण्याची शक्यता असते.
कारणे आणि लक्षणे- मुलाला प्रथम सर्दी व बर्यापैकी खोकला येतो. काही दिवसातच खोकला तीव्र होतो आणि त्याची उबथ वरचेवर येऊ लागते. खोकताना बाळाच्या घशातून हूप असा चमत्कारीक आवाज येऊ लागतो. खोकल्याच्या आवेग जसजसा वाढतो तसतशी संसर्गजन्यता कमी होऊ लागते. बर्याच वेळा होणार्या उलट्यांनी मुलाच्या नाकातील लहान रक्तवाहिन्या किंवा डोळ्यांच्या पापण्यांच्या आतल्या बाजूचे आवरण फुटण्याची शक्यता असते. हा आजार बरेच आठवडे राहतो.
डांग्या खोकल्यामुळे न्युमोनिया आणि कानाच्या मध्यभागाला संसर्ग होणे हे दोन गंभीर आजार होऊ शकतात. आजार अतिशय गंभीर झाल्यास बाळ आचके देऊ लागते. किंवा बाळाला आगडी (फिट) येते. बोर्डटेला पर्ट्युसिस व बोर्डटेला पॅरापर्ट्युसिस या दोन सूक्ष्मजंतूंच्या संसर्गाने डांग्या खोकला होतोय. या दोन्हीपैकी बोर्डटेला पर्ट्युसिसमुळे होणार्या संसर्गाचे स्वरूप तीव्र असते. खोकल्यातील थुंकीच्या एक थेंबातून सुध्दा हा रोग पसरू शकतो.
प्रतिबंध- या विकाराला प्रतिबंध म्हणून बाळ दीड महिन्याचे असताना व नंतर क्रमाने अडीच व साडेतीन महिन्यांनी डीपीटी (ट्रिपल) ची लस टोचली जाते. ट्रिपलचे इंजेक्शन दिल्याने डिपथेरिया (घटसर्प), पर्ट्युसिस (डांग्या खोकला) व टिटॅनस (धनुर्वात) या तीनही रोगांचा प्रतिबंध होतो. होमिओपॅथिमध्ये सुध्दा या रोगांवरील प्रतिबंधक औषधे आहेत.
उपचार- पूर्वी या रोगांवर पूर्ण उपचार उपलब्ध नव्हते. कालक्रमणाने अनेक नवीन उपचार उपलब्ध झालेले आहेत. पाहुया काही घरगुती उपचार.
निसर्गोपचार- लसून- लसणीच्या पाकळ्या सोलून रस काढावा. पाच थेंबापासून ते एक चमचाभर अशी मात्रा ठेवावी.
आले- चमचाभर मेथ्या घेऊन दोन कप पाण्यात उकळाव्यात. मेथ्यांचा अर्क असलेले हे एक कप पाणी, एक चमचाभर ताजा आल्याचा रस चवीला मध असे हे पातळ औषध पाजल्यास खोकला कमी होतो.
मुळा- मुळ्याचा ताजा रस, खडेमीठ व मध यांचे मिश्रणही डांग्या खोकल्यावर उपयुक्त असते.
बदामाचे तेल- पांढर्या कांद्याचा दहा थेंब रस, आल्याचा रस दहा थेंब व बदामाचे तेल पाच थेंब असे मिश्रण थोड्या थोड्या अंतराने द्यावे.
वेखंड- चिमूटभर वेखंड पूड एक चमचा मधातून चाटवल्याने उबळ थांबते.
विहार आणि आहार- तेलकट, आंबट आहार वर्ज्य करावा. पाणी कोमट करूनच प्यावे. बाळाला दमट व गार हवेत नेऊ नये. घराला ओल येत असल्यास आवश्यक बंदोबस्त करावा. खोकून पोट दुखते तेव्हा एरंडेल तेलाने पोटाला मालिश करावे. छाती, पोट, कापड गरम करून त्याने शेकावे.
होमिओपॅथि- होमिओपॅथिमध्ये खोकला घेणार्या व्यक्तीचे वय, लिंग, वर्ण, उंची, शारीरिक मानसिक ठेवण, खोकताना येणारा आवाज, खोकल्याची उबळ येण्याची वारंवारता, कफाचे प्रमाण, खोकल्याचा प्रकार, हवामान, वेळ, मौसम, घशात होणारी खवखव, त्याचा प्रकार, खोकल्यावर कफ पडतो त्याचा रंग, चव (?) कफाचा घट्टपणा, पातळपणा इ. इ. प्रत्येक गोष्टीसाठी अक्षरशः अगणित औषधे आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा खोकला होमिओपॅथिने बरा होतोच.
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 08312431362
सरनोबत क्लिनिक 08312431364