Monday, November 18, 2024

/

एलफीन्स्टन चेंगराचेंगरी : रेल्वेच्या अकार्यक्षमता, असवेंदशीलतेचे बळी..

 belgaum

Vinod rautमुबईतल्या एलफीन्स्टन रेल्वे स्टेशनमधल्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 च्या वर लोक ठार झालेत. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे नवे रेल्वे मंत्री पियुष गोयल लोकलच्या 100 नव्या फेऱ्याचं लोकार्पण करायला मुंबईत आज आले होते. दसऱ्यानिम्मित पंतप्रधानांची मुंबईकरांना जादा लोकल्सची भेट या स्वरुपाचा प्रचारही जोरात सुरु होता. मात्र या घटनेच्या माध्यमातून वेगळीच जीवघेणी भेट रेल्वेकडून मुंबईकरांना दिली गेली आहे.

या घटनेत आतापर्यंत 14 पुरुष आणि 8 महिलांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत. परळ, वरळी आणि प्रभादेवी या भागात काम करणाऱ्यांसाठी एल्फिस्टन रोड हे अतिशय महत्वाचं स्टेशन आहे. शिवाय या भागात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची ऑफिस आहेत. इंग्लीश आणि मराठी, हिंदी, बिझनेस चॅनेलची कार्यालयं देखील याच भागात आहेत. त्यामुळे दररोज नोकरीसाठी इथं शेकडो तरुण येतात. चेंगराचेंगरीत ठार झालेल्यामध्ये व्यक्तींमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. देशाचं भविष्य असलेल्या या तरुणांवर मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये चेंगराचेंगरीत गुदमरून मृत्यू यावा हि लाजिरवाणी घटना आहे. हे तरुण काही जत्रेत, यात्रेला गेले नव्हते. एखाद्या दहशतवादी घटनेत लोक मेली असती तर आपण समजू शकलो असतो. मात्र हे तरुण रेल्वेच्या असवेंदन शीलतेचे, अकार्यशमतेचे, नालायकीचे आणि बेश्रमपणाचे बळी ठरले आहेत. अनेक जण हि दुर्देवी घटना आहे असं म्हणताहेत ते साफ चुकीचं आहे. हे तर रेल्वे अधिकाऱ्यांनी घडवलेलं सामूहिक हत्याकांड आहे.

 

हा पूल अरुंद आणि छोटा आहे. अशा प्रकारची घटना कधीतरी घडणारच होती, हे एखादा शेबंडा पोरगाही सांगू शकला असता. मुंबईत कुर्ला, करी रोड पासून अनेक स्टेशनवर या प्रकारचेे धोकादायक पूल आहेत. हजारो प्रवाशी दररोज आपला जीव मुठीत घेऊन त्या पुलावरून चढतात. ज्या गोष्टी लहान मुलांना समजतात, ती बाब या रेल्वे अधिकाऱ्यांना का समजू नये ? कि समजून घेण्याची गरज वाटत नाही हा मोठा प्रश्नचं आहे.

 

दुसरीकडे रेल्वे मंत्री ,मुख्यमंत्र्यांना रेल्वेच्या पायाभूत (बेसिक) सुविधाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मात्र त्यांना बुलेट ट्रेनची पडलेली आहे. भारतीय रेल्वेला ओव्हरलिंगसाठी काही लाख कोटी रुपयांची गरज आहे, मात्र ते सोडून 1 लाख 20 हजार कोटी खर्चून नव्हेतर कर्ज काढून बुलेट ट्रेन सुरु करायला निघालोय. आता याला काय म्हणावं ? सर्वसामान्यांचा बुलेट ट्रेनला विरोध नाही मात्र कशाला प्राथमिकता द्यायची हा प्रश्न विचारला जातोय.

रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले की आम्ही लवकरच अशा धोकायदायक पुलांचा आढावा घेऊ आणि तातडीने ते काम तडीस नेवू. मात्र या मृत्यूला जबाबदार कोण आहे? त्यांना शिक्षा होणार काय? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणार का? याबद्दल त्यांनी काहीच सांगितलं नाही. ते सांगणार देखील नाही,कारण मुंबई लोकलमध्ये दररोज मरणारी माणसं आता केवळ आकडेवारी ठरलीये, मोजण्यासाठीची.. मिडियासाठी, राजकारण्यासाठी आणि सामान्य मुबईकरांसाठीदेखील…

भारत महाशक्ती म्हणून झेप घेऊ पाहतोय. रेल्वे हि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीची वाहक समजली जाते.मात्र कित्येकवर्षापासून रेल्वेपुढच्या मूळ समस्या जशाच्या तशाच आहेत. आजही रेल्वे फाटकावर पुरेसे कर्मचारी नाही म्हणून अपघात होत असतात. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या एका रेल्वे अपघातामागच कारण होत त्या रेल्वे ट्रकवरुन क्षमतेपेक्षा होणारी जास्त वाहतूक. सरकारे आली,गेली, घोषणादेखील बदलल्या मात्र रेल्वेच्या मूळ अडचणी कायम राहिल्या. UPA काळात नव्या रेल्वेगाड्यांच्या, नव्या मार्गाच्या घोषणा दिल्या जात होत्या, तर NDA च्या काळात वायफाय, स्मार्ट स्टेशन ,फूड ऑन ऑर्डर, प्रीमियर गाड्या अशा प्रकारच्या स्मार्ट घोषणा दिल्या जात आहे. मात्र प्रवाशी सुरक्षा तेव्हाही आणि आजही वाऱ्यावर सोडलेली आहे.

आता या एलफिस्टन रोड स्टेशनच उदाहरण घ्या, या स्टेशनच नाव प्रभादेवी करा हि मागणी शिवसेनेनं लावून धरली, मागणी पूर्णही झाली, मात्र या स्थानकावरील मूलभूत सुविधा जैसे थे राहिल्या. स्टेशनचं नामकरण करून काय फरक पडला ? त्यापेक्षा हि ऊर्जा हा पूल मोठा करण्याच्या मागणीसाठी लावली असती तर एवढ्या प्रवाशांवर बळी जाण्याची वेळ आली नसती.

अपघात झाल्यावर आता मुबईकारांच्या स्पिरिटवर कौतुकाची भली मोठी फुंकर घातली जाईल. मात्र या स्पिरिटवर जाऊ नका ति हतबलता आहे जगण्याची. त्यामुळे उद्या त्या पुलावरून जाण्यासाठी तेवढीच गर्दी होईल. तिथे श्रद्धांजली आणि मेणबत्या लावण्यासाठीही जागा नाही. त्यापेक्षा रेल्वेला, सरकारला अकाउंटेबल करा…

विनोद राऊत, पत्रकार

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.