समाजातील रामोशी,बेडर, दलित,भटकी विमुक्त अशा वंचीत घटकांकसाठी तब्बल चार दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ.भीमराव गस्ती काळाच्या पडद्या आड गेले. आपले सारे आयुष्य समाजाच्या हितासाठी खर्ची घालण्याचा घेतलेला निर्णय त्यांनी शेवटच्या श्वासा पर्यंत प्रत्यक्षात आणला.तहसीलदारपासून, पंतप्रधान,राष्ट्रपती यांच्यापर्यंत गार्होणे घालून वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अर्ज विनंत्या पासून रस्त्यावरील आंदोलना पर्यंत लोकशाहीतील साऱ्या हत्यारांचा त्यांनी प्रभावीपणे वापर केला. देवदासींच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले काम दिशादर्शक आणि आश्वासक स्वरूपाचे म्हणता येईल.डॉ. भीमराव गस्ती हे नाव उच्चारल्या नन्तर समाजातील दलित ,मागास ,वंचित घटकांसाठी आश्वासक स्वरूपात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रतिमा समोर येते. गडहिंग्लज, आजरा,चंदगड, बेळगाव पासून थेट बंगळूर पर्यंत आणि आंध्र प्रदेशात त्यांचे व्यापक कार्यक्षेत्र होते. ब्रिटीश काळात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बेडर रामोशी समाजाने दिलेले योगदान खूप मोठे आहे.त्याच समाजात जन्मलेल्या डॉ.गस्ती यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत विज्ञान शाखेची पदवी मिळवली. चांगली नोकरी मिळत असताना सुद्धा समाजासाठी काहीतरी केले पाहिजे हा त्यांचा निर्धार होता.
शिक्षण घेताना त्यांना रशियात जाऊन अभ्यासक्रम करण्याची संधी मिळाली. एवढी शैक्षणिक पात्रता घेतलेल्या बेडर रामोशी समाजातील डॉ. भीमराव यांनी ग्रामीण भागातील गोर गरीब वंचित घटकांसाठी केलेले काम महत्वपूर्ण आहे. सामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावर अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यापासून ते लोकप्रतिनिधींना साकडे घालण्या पर्यंत आग्रही भूमिकेत ते वावरत होते. महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करून त्यांनी दुबळ्या समाजासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले. इंदिरा गांधी ,राजीव गांधी यांचा पासून ते राष्ट्रपती पर्यंत निवदने देऊन शिष्टमंडळ भेटण्याचे काम केले. बेळगाव दौऱ्यावर येणारे केंद्रीय आणि राज्यस्तरीय मंत्र्यांना त्यांनी साकडे घालताना रस्त्यावरील हजारोंच्या संख्येने मोर्चाचे जाऊन निदर्शने करण्याचा कार्यक्रम ही अनेकवेळा पार पडला. देवदासींच्या प्रथे विरुद्ध त्यांनी लढा दिला. देवदासींच्या पुनर्वसनासाठी त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र शासन कडे केलेल्या पाठपुराव्यातून कर्नाटकात देवदासी पुनर्वसनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. देवदासींच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली. अनेक ठिकाणी वसतिगृहाची व्यवस्था करून देवदासींच्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाह खाली आणले. काही मुली पोलीस आणि महसूल खात्यात उच्च पदावर कार्यरत आहेत. शिक्षणातून परिवर्तन हे सूत्र त्यांनी ओळखले होते .त्यामुळे मागासवर्गीयांसाठी शिक्षण हेच प्रभावी साधन असल्याचे ते आवर्जून सांगत होते. त्यांनी केलेल्या कार्याची विविध स्तरावर नोंद घेण्यात आली. समाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. शासनाच्या स्तरावर अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडीयूराप्पा यांनी डॉ.गस्ती यांच्या घरी जाऊन लाखांचा पुरस्कार देऊन गौरव केला. त्यांनी आपल्या जीवनात त्यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवावर आधारित काही पुस्तके लिहिली. त्यातील बेरड हे आत्मकथन करणारे पुस्तक खूपच गाजले. अनेक भाषांत त्यांचे भाषांतर झाले. काही अभ्यासक्रमात ही त्यांची पुस्तके लागली. चळवळीतील अनुभवाचा खजिनाच त्यांच्याकडे होता.
त्यांचे राजकारण आणि समाजकारण भाकरी भोवतीच फिरत होते. गरिबांना भुकेच्यावेळी दोन घास जेव्हा मिळतील त्यावेळीच खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळाला असे म्हणता येईल अशी त्यांची भूमिका होती राजकीय पक्षां बाबत त्यांचे अनुभव फार चांगले नव्हते. कोणता हि राजकीय पक्ष सत्तेवर आला तरी सामन्यांना न्याय मिळेलच अशी खात्री नाही अशी त्यांची अनुभवातुन भावना झाली होती. त्यामुळे संघटित होऊन आपले प्रश्न आपणच सोडवणू कीसाठी सज्ज राहिले पाहिजे हा मंत्रच त्यांनी आपल्या समाज बांधवांना दिला होता. मेळावे घेऊन त्यांनी प्रबोधनाच्या वाटेवर हि प्रभावीपणे काम केले. नानासाहेब गोरे, एस.एम. जोशी, ग.प्र.प्रधान या समाजवादी विचारधारेतील ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध होते. अशा परि वारातूनच आपल्याला खूप काही शिकता आले असे ते सांगत असत. गेले काही दिवसांपासून ते संघ परिवारात दाखल झाले होते. समाजातील जे जे चांगले अशाच ठिकाणी त्यांचा वावर होता . त्यांचा मित्रपरिवार हि खूप वेगवेगळ्या क्षेत्रात विखुरला आहे. चळवळीसाठी त्यांनी दिलेले योगदान , गोरगरीब आणि वंचित घटकांसाठी मोठा आधार बनून राहिले होते. वंचितांचे अश्रू पुसण्या सारखा दुसरा आनंद नाही त्यामुळेच आपण शेवटच्या श्वासा पर्यंत वंचितांच्या कामातच सक्रिय राहणार असा त्यांचा निर्धार होता आणि अखेरच्या श्वासां पर्यंत त्यांनी तो प्रत्यक्षात आणून कृतिशील कार्यकर्ता कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ आपल्या जीवनपटातून दाखवून दिला. डॉ. गस्ती यांच्या निधनाने वंचीतांची सावली, वंचितांचा आधार नाहीसा झाला आहे. चळवळीच्या दृष्टीने विचार करताना एक जाणता कार्यकर्ता काळाच्या पडद्या आड गेल्याने चळवळीची हानी झाली आहे.
सुभाष धुमे-जेष्ठ पत्रकार गडहिंग्लज