मराठा म्हणजे मोडेन पण वाकणार नाही असा कणखर बाणा असतो मात्र बेळगावातील मराठा युवक संघाची करतूद पाहिल्यास यांच्यातलं मऱ्हाटेपण कमी होत आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे.एकीकडे बेळगावातील मराठा समाजात आमदार महापौर नगरसेवक सह अनेक दिगज पदे असताना नेहमी मराठी विरोधी गरळ ओकणाऱ्या मराठी विरोधी काम करणाऱ्या बेळगावच्या दोन्ही खासदारांना कार्यक्रमात बोलावल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रविवारी मराठा युवक संघाच्या स्विमिंग स्पर्धांचे उदघाटन खासदार सुरेश अंगडी आणि राज्यसभा खासदार प्रभाकर कोरे यांनी केलं. केवळ उदघाटनच नव्हे तर राज्यसभा खासदाराचा केक कापून बी लेटेड वाढ दिवस देखील साजरा करण्यात आला आहे. खासदार द्वयी पैकी एकास केंद्रात राज्य मंत्री पद मिळण्याची शक्यता असल्याने माजी नगरसेवक असलेल्या एका आणि उचगाव भागातील स्वयंघोषित व्यापारी कम पुढाऱ्याने स्वता कडे मराठा समाजाची सूत्रे ठेवण्यासाठी या मराठी द्वेषी खासदारांचा सत्कार करुन कार्यक्रमास बोलवले आहे अशी देखील चर्चा सुरू आहे.
मराठी समाजात अनेक उद्योजक लोकप्रतिनिधी असताना मराठा युवक संघाने मराठी विरोधी खासदार जोडीला बोलावून सन्मान देणे अनेक कट्टर मराठी जणांच्या जिव्हारी लागले आहे. मराठा युवक संघ उदार आहे मराठी द्वेषीना बोलवून सत्कार करतो मात्र त्या खासदारांच्या समाजाने कधी कुठल्या मराठी नेत्यांचा सत्कार वाढदिवस केलाय का? हा विचार करणे देखील गरजेचे बनले आहे.मराठी संस्था मधील स्वतःची पदे टिकवण्यासाठी परक्या नेत्यांचा आसरा घ्यावा लागत आहे अशी देखील जोरदार चर्चा आहे.
बेळगाव live ने मराठा युवक संघाच्या अध्यक्षाना या बाबतीत छेडले असता खासदारांनी 5 लाखांचा निधी व्यायाम शाळेसाठी दिला व्यायाम स्पर्धा त जात भेद करत नाही इतर मराठा नेते कार्यक्रमास हजर होते अशी सारवासारव केली तर खासदार द्वयीना बोलावण्यात पुढे असलेले बाळासाहेब काकतकर यांनी वाढ दिवस जोरात केलो अशी प्रतिक्रिया दिली.
बेळगाव शहराचं नाव बेळगावी करण्यात अग्रभागी असलेल्या या जोडगोळीची जवळीक साधल्याने मराठा युवक संघाच नाव बदलून ‘मरा’की संघ होईल यात शंका नाही.