रामभाऊ पोतदार हे राजकारणातील एक चांगला माणूस म्हणून परिचित होते. रामकृष्ण हेगडे यांच्या सरकारातील औद्योगिक सहकार खात्याचे मंत्री आणि विधानपरिषदेचे सभापती या महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे.
बेळगावात सहकारी साखर कारखाना उभारावा हे त्यांचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले आहे. आपल्या समकालीन सवंगड्यांना हाताशी धरून त्यांनी काकतिच्या माळावर मार्कंडेय को ऑप साखर कारखाना उभारला होता, मात्र आजवर दुर्दैवाने तो कारखाना चालू होऊ शकला नाही.
रामभाऊ हे बेळगावच्या प्रतिष्ठित पोतदार कुटुंबातील एक सदस्य. त्यांचे वडील भीमराव पोतदार हे ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन रामभाऊ घडत गेले. बेळगावच्या आर्थिक क्षेत्रातील सर्वात जुनी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पायोनियर अर्बन बँकेची स्थापनाही राम भाऊनीच केली आहे.
ते पुण्याच्या प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेज मधून पदवीधर झाले. ते मराठी साहित्याचे मोठे अभ्यासक होते. प्रसिद्ध मराठी नाटककार राम गणेश गडकरी यांचे ते निस्सीम चाहते होते. गडकऱ्यांची सारी नाटके त्यांनी पाहिली होती. आपल्या भाषणात ते त्या नाटकातील प्रसिद्ध संवादाचा उल्लेख करायचे.
जनता परिवार तसेच बड्या राजकारणींशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण, रामकृष्ण हेगडे, देवेगौडा, बोंमाई, मधु लिमये, हरणहळ्ळी रामस्वामी यांची नावे घेता येतील. देवेगौडा तर आपल्या बेळगाव भेटीत त्यांची भेट घेणे चुकवत नसत.
१९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात ते काँग्रेस चे अध्यक्ष होते. हिंडलगा कारागृहात असणाऱ्या अनेकांना त्यांनी त्या काळात मदत केली आहे.
बेळगावातील जुन्या नर्तकी टॉकीज चे ते मालक. चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी तयांचा घनिष्ठ संबंध होता. राज कपूर, व्ही शांताराम, दिलीप कुमार, सुलोचना, जयश्री गडकर, भालजी पेंढारकर हे त्यांच्यासाठी अनेकदा बेळगावला आले आहेत.
त्यांच्या पश्चात अविनाश पोतदार हे त्यांचे पुत्र आहेत.