Monday, January 6, 2025

/

आत्महत्या आणि आपण- विलास अध्यापक

 belgaum

Vilas adhyapakरोजचे वृत्तपत्र उघडले की एक तरी किमान आत्महत्येची बातमी वाचायला मिळते.परीक्षा झाल्यावर किंवा रिझल्ट लागल्यावर तर विद्यार्थी  कमी मार्क पडले म्हणून किंवा नापास  झाल्यामुळे आत्महत्या करतात.पालकांनी हट्ट पूर्ण केला नाही म्हणून देखील तरुण,तरुणी आत्महत्या केल्याचे प्रकार घडले आहेत आणि घडताहेत.
,
आत्महत्या करण्यामागची कारणे बरीच आहेत.केवळ विद्यार्थी नव्हे तर मध्यमवयीन    व्यक्ती आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.पालकांच्या अवास्तव अपेक्षा,पालकांनी एखाद्या गोष्टीला विरोध करणे,मुलाचा हट्ट पूर्ण  न करणे,मुलावर रागावणे अशी आणि बरीच कारणे विद्यार्थी,तरुण तरुणी यांच्या आत्महत्येमागे असू शकतात.मध्यमवयीन व्यक्ती आत्महत्या कऱण्यामागे नाते संबंधातील ताण तणाव,कामाच्या ठिकाणी वाढलेली जबाबदारी,कुटुंबातील व्यक्तींच्या अपेक्षा पूर्ण करू न शकणे,वरिष्ठांचा जाच,व्यसनाच्या आहारी जाऊन कर्जबाजारी होणे  अशी कारणे आहेत.
समाजजीवनात घडून आलेले बदल ,कुटुंब व्यवस्थेत घडून आलेले बदल,विज्ञान तंत्रज्ञानातील  लागलेले शोध त्याचा मानवी जीवनावर झालेला परिणाम आदी बाबी देखील आत्महत्येचे विचार मनात आणण्यास  कारणीभूत ठरलेत.
मुलांच्यावर कमी होत चाललेले संस्कार,विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पालक मुले यांच्या नात्यात आलेला कोरडेपणा, दिवसभर  घराबाहेर नोकरीच्या कारणामुळे असलेले पालक,मुले  पालक यांच्यात हरवत चाललेला संवाद,मुले काय करतात याकडे होणारे दुर्लक्ष,मुलांच्या मनाची होत असलेली घुसमट यामुळे आत्महत्येच्या घटना घडत आहेत.नोकरीतील व्यवसायातील दडपण,वरिष्ठांचा जाच,मंथली टार्गेट्स ,उत्पन्न खर्च यांचा ताळमेळ न जमल्यामुळे कर्जबाजारी होणे,अपयश येणे,कौटुंबिक ताणतणाव,व्यवसायातील नुकसान,स्वकीयांनी किंवा जवळच्या लोकांनी केलेली फसवणूक अशी अनेक कारणे मध्यमवयीन व्यक्तींच्या आत्महत्येमागे असू शकतात.
विज्ञान तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आले आहे पण माणूस माणसापासून खूप दूर गेला आहे.पूर्वीप्रमाणे लोकांच्या गप्पा होत नाहीत,नियमित मित्रांच्या जवळच्या व्यक्तींच्या गाठीभेटी होत नाहीत त्यामुळे मनात सलत असलेली गोष्ट कोठे उघड करता येत नाही परिणामी मनाची घुसमट अधिक वाढते आणि मनात नैराश्य दाटून येऊन नको त्या गोष्टीकडे माणूस वळतो.मुलांसाठी पालकांनी वेळ द्यायला पाहिजे.त्यांच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादू नये.त्यांना काय वाटते ते समजून घ्या.त्यांच्याशी संवाद साधा त्यांच्या दुःखावर फुंकर घाला.कोणत्याही प्रसंगात आम्ही तुमच्या सोबत आहोत हा विश्वास पालकांनी देणे आवश्यक आहे.मुलांच्या हातून काही चुका झाल्या तरी त्यांना समजावून सांगा म्हणजे एक विश्वास,आपुलकीचे नाते निर्माण होईल.मुलांवर योग्य संस्कार करणे देखील पालकांची जबाबदारी आहे.अपयश पचवण्यास शिकवा,निराशेवर मात करायला शिकवा,कोणत्याही कठीण प्रसंगी मुलांना आम्ही तुझ्या सोबत आहोत हा विश्वास द्या म्हणजे मुलांच्या मनात आत्महत्येसारखे विचार कधीच येणार नाहीत.

आर्टिकल लेखन

विलास अध्यापक-ए बी पी माझा बेळगाव

9480417688

 

 

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.