शिवसेनेतून बाहेर पडून वेगळी चूल मांडलेले, प्रखर विचारांचे, भाषिक अस्मिता बाळगणारे, उत्कृष्ट वक्तृत्व शैली असणारे नेते ही राज अर्थात राजसाहेब ठाकरे यांची ओळख. मराठीच्या मुद्द्यावर लढूनही मतदारांनी त्यांना आजवर गुद्देच दिले हे त्यांचे वास्तव, सीमाभागातील मराठी जनांना त्यांनी दिलेला तिथेच राहा चा सल्ला म्हणजे ज्या मराठीसाठी ते लढताहेत त्याच भाषेशी केलेली गद्दारी आणि आता कर्नाटक रक्षण वेदिकेने दिलेले परिषदेचे आमंत्रण स्वीकारून आपला माणूस धाडून देण्याची त्यांनी केलेली तयारी म्हणजे ? वेदिकेच्या राष्ट्रभाषा हिंदीच्या काविळीला मनापासून दिलेली साथ म्हणावी का ? बेळगावातल्या मराठी जणांना डिवचण्या साठी कन्नड वेदिकेला राज ठाकरे जवळचे वाटू लागले आहेत का?
कर्नाटक रक्षण वेदिकेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आमंत्रण दिले आहे. प्रादेशिक भाषा अस्मितेची मोट बांधण्यासाठी एक दिवसीय चर्चा शिबिराचं बंगळुरूत आयोजन करण्यात आलय.येत्या शनिवारी हे एक दिवसीय चर्चा शिबिर होते आहे. देशभरात प्रादेशिक भाषा अस्मिता कडवटपणे जपणाऱ्या राजकीय पक्ष आणि संघटनांना या शिबिरासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये मनसे सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. पक्षाचे नवनियुक्त सरचिटणीस संदीप देशपांडे यांना भूमिका मांडण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. ही काल म्हणजेच मंगळवारी दिवसभर फिरलेली बातमी.
कर्नाटकातच राहा असे ज्या मराठी भाषिकाला राज ठाकरे म्हणाले होते त्या मराठी माणसासाठी ही बातमी अस्वस्थ व्हायला लावणारी आहे. कर्नाटक वेदिका हिंदी विरोधी भूमिकेठाई बोलावते काय आणि मनसे हे आमंत्रण स्वीकारते काय सारेच विचित्र आहे. बरे जी वेदिका गेली ६० ते ६२ वर्षे मराठी माणसाला चिरडत आणि भरडत आली आहे तिला राज आणि त्यांची मनसे इतकी जवळची का वाटावी? कारण सोप्पे आहे ज्या मराठी सीमावासीयांच्या पाठीशी राज हवे होते तेथे ते नाहीत, यामुळेच ते कन्नडीगांना आपले वाटू लागले आहेत, यामुळे पुढील काळात कर्नाटकात कन्नडच चालेल असे म्हणून राज ठाकरेंनी आपली शाखा बेंगळुरुत काढली आणि जय मराठी किंवा महाराष्ट्र म्हणणाऱ्या सिमवासीयांचाच खळ्ळ खट्याक केला तरी जास्त वाईट वाटून घेऊ नये याची मानसिक तयारी आता आम्हाला करावी लागेल.
बेंगळुरुत मेट्रो स्थानकांच्या हिंदी भाषेत नामकरणाचा वाद पेटलाय. सध्या तेथे कन्नड कमी आणि साऱ्या देशातील इतर भाषिकच अधिक ही स्थिती आहे, आपल्या राज्याच्या राजधानीतच मातृभाषा टिकत नाही तेथे मेट्रो केंद्रांची नावे हिंदी होतील तर या विचारानेच त्यांची सध्या वाट लागली आहे, त्या पार्श्वभूमीवर या शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे. डीएमके, एआयडीएमके, तेलगू देसम, तृणमूल काँग्रेस, अशा सर्वांनाच आमंत्रण देण्यात आलेय. भाषा अस्मितेसाठी प्रसंगी राज्यांमधले आपापसातले टोकाचे मतभेद बाजूला ठेवत हिंदी भाषा अतिक्रमण विरोधी लढा उभारण्यासाठी प्रादेशिक मोट बांधण्याचा कर्नाटक रक्षण वेदिकेचा हेतू आहे.
मात्र मनसे राष्ट्रभाषा विरोधी आहे असे यापूर्वी कधी दिसली नाही, बहुतेक राज ठाकरेंनी आपली मोठी गल्लत करून घेतली आहे, महाराष्ट्रात नोकरी धंद्यांसाठी येऊन मराठीचा अनादर करणाऱ्या भैय्यांविरोधात ते लढत होते. कन्नड भाषेचा कधीच अनादर न करणाऱ्या , मूळ घरालाच मूळची मराठी पाटी पुसून कानडी करणाच्या वरवंट्याखाली अडकलेल्या आणि मराठी साठी आक्रोश करणाऱ्या सीमाभागातील मराठी भाषिकांची तुलना त्यांनी त्या आगंतुक भैय्यांशी करायची तशी काहीच गरज नव्हती, चलो ठीक आहे, आम्हाला अशा नेत्याच्या पाठिंब्याची गरजच नाही, पण मुंबई महाराष्ट्रात मराठी जपण्यासाठी लढणारे राज ठाकरे हिंदी विरोधी कधीपासून झाले? सुप्रीम कोर्टात प्रश्न प्रलंबित असतेवेळी बेळगाव सीमा प्रश्नी नेहमी आक्रमक असलेल्या शिव सेनेला डिवचण्यासाठी कन्नड वेदिकेने मनसे शी हातमिळवणी केली असावी का असा देखील संशय या निमिताने येत आहे .
राजसाहेब, पुन्हा एकदा उजळणी केलीत तर बरे होईल, ज्या हिंदुहृदय सम्राटांचे प्रतिरूप म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहिले, त्या गोष्टीचा भ्रमनिरास झालाच आहे, आता तुमच्याच भाषेत आजपर्यंत झाले ते झाले पुढेतरी जरा विचाराने वागा असे समस्त सीमावासीयांच्या वतीने तुम्हाला सांगण्याची वेळ आली आहे. त्या बातमीने सीमाभागात जी चर्चा आहे ती अतिशय शुद्ध भाषेत सांगण्याचा हा एक प्रयत्न.