युती सरकारला आता लवकरच तीन वर्षे पूर्ण होतील. मात्र या कालावधीत फार कमी मंत्र्यांना आपल्या कामाचा ठसा उमटवता आला. मंत्रिमंडळातील अनेक चेहरे वादाच्या, काही आरोपांच्या भोवऱ्यात अडकले तर काही अंतर्गत राजकारणात डावपेचात सापडले. मात्र सत्तेच्या या धुरळ्यातही काही मोजके चेहरे सामान्य माणसांच्या हृदयात स्थान निर्माण करू शकले. सुधीर मुनगंटीवार हे असंच एक नाव.
सत्तेत असूनही सत्तास्पर्धेत ते कधीच सामील झाले नाहीत. त्यामुळे सत्तेच्या या वर्तुळातही सुधीरभाऊच वेगळेपण उठून दिसतं.
एखादी गोष्ट करायची ठरवली की ती कुठल्याही परिस्थितीत तडीस कशी न्यायची हे कुणीही भाऊंकडून शिकावं. राज्यातील वृक्षलागवाडीची मोहीम याच जिद्दीतून, ध्येयातून त्यांनी यशस्वी करून दाखवली.
दोन वर्षांपूर्वी वृक्षारोपण हा राज्यभरात टिंगलटवाळीचा विषय होता. मात्र कल्पनाशक्ती, अथक मेहनतीच्या जोरावर सर्वांना सोबत घेऊन या मोहिमेला त्यांनी लोकचळवळीचं स्वरूप दिलं. जेव्हा भाऊंनी वृक्षमोहिमेला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला अनेकांनी टीका केली, खिल्ली उडवली, शंका उपस्थित केल्या. मात्र एका शब्दानं त्या टिकेला भाऊंनी कधी उत्तर दिलं नाही. ते म्हणायचे लोकांचं काही चुकलं नाही, कारण आजपर्यंत वृक्षलागवड मोहीम केवळ सरकारी मोहीम ठरल्या, कारण कुठल्याही सरकारी मोहिमेत जोपर्यंत सामान्य माणूस सहभागी होत नाही तोपर्यंत ती मोहीम यशस्वी होऊच शकत नाही. त्यामुळे भाऊंनी पहिलं काम केलं ते म्हणजे सामान्य माणसाला या मोहिमेत जोडलं आणि आज ही मोहीम राज्य सरकारची फ्लॅगशिप मोहीम ठरली आहे. लोकशिक्षणाची चळवळ नव्याने उभारली गेली. आणि हे या चळवळीचं सर्वात मोठं यश आहे.
राज्यात कुठेही आता गुगल मॅपच्या माध्यमातून एका क्लिकमध्ये आपण कुठे वृक्षारोपण झालं हे बघू शकतो. पुढच्या वर्षापर्यंत लावलेल्या झाडांची परिस्थिती काय आहे, हे राज्यातला कुठलाही सामान्य माणूस तपासून पाहू शकणार आहे. एवढा पारदर्शीपणा सुधीरभाऊंनी या मोहिमेत आणला आहे. सुरुवातीला दोन कोटी वृक्षांपासून सुरू झालेली ही मोहीम आता आता चार कोटींवर पोहोचली आहे. उर्वरित दोन वर्षांत 50 कोटी वृक्षलागवाडीचं लक्ष्य भाऊंनी डोळ्यापुढे ठेवलंय.
सत्तेत असूनही सत्तास्पर्धेपासून भाऊ कायम लांब राहिले, त्यांचा तो स्वभाव नाही. सुधीरभाऊंकडे दोनदा वजनदार समजल्या खात्याची जबाबदारी चालत आली मात्र भाऊंनी ही संधी स्वतःहून नाकारली. माझ्या खात्यावर माझी चांगली पकड निर्माण झाली आहे. त्यामुळे आता फोकस हलायला नको म्हणून सुधीरभाऊंनी ही खाती नम्रपणे नाकारल्याचं मी बघितलंय. सध्याच्या गळेकापू स्पर्धेत असं चित्र आता अभावानं पाहायला मिळतं.
काम, तक्रारी घेऊन आलेल्या सर्वांना भाऊ अटेंड करतात. त्यामुळे मंत्रालयातील 5व्या मजल्यावरचं त्याचं कार्यालय लोकांनी कायम गजबजलेलं असतं. भाऊ सर्वांना वेळ देतात. त्यांच्या कामाचा निपटारा करतात. अनेकदा मंत्र्यांना अनेक बैठकी, कार्यक्रम असतात त्यामुळे अनेकदा त्यांच्यापुढे बसलेला व्यक्ती काही सांगत असतो आणि मंत्री वेगळ्याच जगात असतात. मात्र भाऊ समोर बसलेल्या व्यक्तीच्या अडचणीला, तक्रारींना समजून घेऊन, त्याला 100 टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करतात, अनेकदा त्यांना पुढील बैठकीला उशीर होतो, त्यांच्यावर टीका होते मात्र भाऊ त्याची फिकीर करत नाही. दिवंगत प्रमोद महाजन यांच्याकडून घेतलेला गुरुमंत्र आजही भाऊ काटेकोरपणे आणि कसोशीने पाळतात.
राज्यभरातून भाऊंना केलेल्या प्रत्येक कॉलला हमखास उत्तर मिळतं. साधारपणे भाऊ दिवसाला 300 ते 400 कॉल अटेंड करतात, स्वतः उत्तर देतात. प्रत्येक SMS ला उत्तरं दिली जातात. दिवसातील काही बैठकीचे, कार्यक्रमाचे काही तास सोडले तर ही प्रक्रिया दिवसभर सुरू असते. भाऊंना आलेल्या प्रत्येक कॉलची काळजीपूर्वक नोंद घेतली जाते आणि भाऊंना जसा वेळ मिळेल तेव्हा तो फोन लावून दिला जातो. अनेकदा “भाऊ तुमचं जेवण झालं का, चंद्रपूरला तुम्ही केव्हा येणार, कसे आहात, सहज आठवण आली अशा स्वरूपाचे बहुतांश फोन असतात मात्र भाऊ न कंटाळता या सर्व फोनना उत्तर देतात.
शेतकरी कर्जमाफी जाहीर केल्यावर आर्थिक काटकसर करण्याचं आवाहन अर्थमंत्री या नात्यानं भाऊंनी केलं होतं. दुसरीकडे एका रात्री GST चं रोलआऊट होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वृक्ष लागवड मोहिमेला सुरुवात होणार होती. त्यामुळे शासकीय विमान घेऊन भाऊंनी पहाटे मुंबई गाठली यावर काही वृत्तपत्रांनी टीका केली. भाऊ यावर खूप व्यथित झाले, ते म्हणाले मध्यरात्री उशिरा कार्यक्रमाला हजर राहून सकाळी मुंबईचा कार्यक्रम करणं कठीण होतं त्यामुळे नाईलाजानं शासकीय विमानाचा पर्याय घेतला. फार कमी लोकांना माहित असेल की बिझनेस क्लास लागू असतानाही भाऊ आजही केवळ इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करतात.
शब्दाला आता राजकारणात फारशी किंमत उरलेली नाही मात्र सारासार विचार करून एकदा शब्द दिला की वाटेल त्या परिस्थितीत तो पाळणे हा भाऊंचा स्वभाव आहे.
विदर्भातील राजकारणी अघळपघळ असतात, नियोजनात मागे असतात असा सर्वसाधारण समज आहे. मात्र हळूहळू हा गैरसमज आता दूर होत चालला आहे. सुधीरभाऊंनी त्यांच्या खात्यातील कामं गतीनं आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेमुळे जनतेच्या कामाचा नीट फॉलोअप घेणं शक्य होत आहे. सर्व स्वीय सहायक, OSD यांचे दूरध्वनी क्रमांक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावलेत. प्रत्येक अधिकाऱ्याच्या केबिनबाहेर त्याच्याकडे कुठली जबाबदारी देण्यात आली आहे हे सुद्धा ठळकपणाने लिहिलंय. सर्व फाईल्सची, दिलेल्या कामाची परिस्थिती काय आहे याचा नेमका ठावठिकाणा घेण्यासाठी भाऊंनी आयटी यंत्रणाची मदत घेतली. या सर्व नियोजनबद्ध कामाची दखल घेत, सुधीरभाऊंच्या कार्यालायला ISO प्रमाणपत्र मिळालंय. ISO प्रमाणपत्र मिळणारं सुधीरभाऊंचं कार्यालय हे देशातील पहिलं मंत्री कार्यालय ठरलंय. भाऊंचं चंद्रपुरातील जनसंपर्क कार्यालय अशाच नियोजनबद्ध रीतीने गेले कित्येक वर्षे सुरू आहे.
त्यांचा एक स्वभाव मला फार आवडतो, तो म्हणजे भाऊ कधीच कुणाच्या पाठीमागे, कुणावरही एका शब्दाने टीका करत नाही. या स्वभावामुळे त्यांच्यात प्रचंड सकारात्मक ऊर्जा असते. त्याच्यावर जाहीर टीका करणाऱ्यांच्या विरोधातसुद्धा ते पाठीमागून बोलत नाही. ते म्हणतात, आपल्याकडे करण्यासाठी किती कामं पडली आहेत, मग कशाला आपला वेळ फालतू कामावर वाया घालवायचा. मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे, असं काम करा की तुमचं नाव येणारी पुढची पिढी लक्षात ठेवेल आणि भाऊ असंच काम करत आहेत…
खुप सुंदर लेख.. भाऊंचे स्वभावगुण आणि दूरदर्शीपणा अचूक मांडले आहे .. असा दूरदर्शी व आदर्श नेता महाराष्ट्राला लाभणे हे आपले भाग्य आहे .. भवाढदिवसानिमित्त त्यांना खुप खुप शुभेछ्या ।