कालच बेळगावच्या महानगरपालिकेत महापौरांनी आयुक्तांना झाडले.कारण होते प्रोटोकॉल चे. आज याच प्रोटोकॉल वर खासदार सुरेश अंगडी टाईम्स नाऊ वृत्त वाहिनीकडे बोलले असे ऐकायला आले. महापौर शिक्षिका आहेत त्या बोलतात हे माहीत होते. त्यांनी संतापून हातात छडी घेतली नाही हे बरे झाले. मात्र खासदार अंगडी बोलतात हे नव्याने कळले, असो विषय तो नाही विषय आहे प्रोटोकॉल चा. तो द्या म्हणून मागवा लागतो या दुर्दैवी परिस्थितीचा.
प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधींनी मिळून बनलेल्या जनपीठाच्या सदस्यांना आणि प्रमुखांना काही विशेष मानसन्मान असतात. काही ठिकाणी त्यांना स्थान द्यावेच लागते, ते दिले जावे हे पाहण्याची जबाबदारी असते सरकारी बाबूंची. त्यांनी ती पाळली नाही की मग प्रोटोकॉल चा भंग होतो. यासाठी आपले काय प्रोटोकॉल आहेत हे पहिल्यांदा त्या लोकप्रतिनिधीला माहीत असावे लागते, बऱ्याच जणांना ते माहीत नसतात, यातून मग बरेचकाही घडत राहते आणि त्याची चर्चाही होते.
मनपाच्या पहिल्या कौन्सिल चे महापौर सुभाष जाधव यांच्या काळाची आठवण अनेक जुने लोक नेहमीच काढतात. सुभाष जाधव आले की महापौर आल्या सारखे वाटायचे. अधिकारी त्यांना टरकुन असायचे, आत्ता महापौर आणि नगरसेवकच अधिकाऱ्यांना टरकुन राहिल्याची उदाहरणे बघायला मिळतात. उगीच काहीतरी बोलायचो आणि महिन्याचे पाकीट यायचे नाही याची भीती त्यामागे असते कदाचित, म्हणून मग सरकारी बाबू माजतात.
संभाजी पाटील हे तर चारवेळा महापौर होते. त्यांचाही दरारा असायचा. प्रोटोकॉल आणि कायद्याचा नीट अभ्यास करून ते कामे करायचे आणि करून घ्यायचे असे खुद्द अधिकारीच सांगतात, महापौर असताना संभाजी पाटील यांनी या पदाची शान वाढवली. शिवाजी सुंठकर, अगदी तीनच महिने महापौर झालेले विजय मोरे यांचीही उदाहरणे बोलून दाखवली जातात. ही सगळी मंडळी या पदावर होती याचे कुणालाही विस्मरण होऊ शकत नाही.
मुद्दा असा अलीकडच्या काळात महापौर झालेल्यांनी मात्र ही शान जपली नाही.
एक महिला माजी महापौर दररोज आयुक्तांच्या बंगल्यावरच जाऊन नाष्टा करायच्या, आणखी एक माजी महापौर महिलेने निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच जाण्यास सुरुवात केली होती. अहो डिसि, एसपी, कमिशनर हे अधिकारी महापौरांनी बोलावून घ्यायचे असतात, त्यांच्याकडे आपण जाणे म्हणजे प्रोटोकॉल नव्हे हे यांना कोण सांगणार?
असो, सध्याच्या महापौर त्याबाबतीत आक्रमक झाल्या म्हणजे किमान त्यांनी प्रोटोकॉल चे पुस्तक वाचले असण्याची शक्यता आहे. त्या शिक्षिका असल्याने त्यांना वाचता येते ही एक जमेची बाजू आहे. मात्र त्यांनी या पदाची मान वाढविण्यासाठी ही भूमिका कायम राखावी लागेल.
आता मुद्दा अंगडींचा, अंगडी साहेब आजवर जेंव्हा जेंव्हा बोलले तेंव्हा तेंव्हा त्यांच्यावर सुनामीच कोसळली आहे. कसेही असले तरी बिचारे चारित्र्याने बरे आहेत. विमानतळावर त्यांना द्या प्रोटोकॉल कशाला उगाच नकार?खासदरकीचा मान त्यांना मिळालाच पाहिजे. पण विमानतळावर आदर केला म्हणून तेथील भ्रष्टाचारकडे दुर्लक्ष करू नका अंगडी साहेब म्हणजे झाले!
Trending Now