साजिद सय्यद हे नाव बेळगावात सामाजिक क्षेत्रात कार्यरत प्रत्येकालाच माहित आहे. प्रत्येक आंदोलनात सर्वात पुढे असणारा लढाऊ माणूस ही त्यांची ओळख आहे. बेळगाव शहरात शांतता नांदो यासाठी ते कायम झटत असतात आपल्या परीने प्रयत्न करत असतात असे आहेत आमचे या आठवड्याचा माणूस मान मिळवलेले साजिद भाई … सामाजिक कामात पूर्णपणे लक्ष्य देता यावे म्हणून लग्नही न करता पूर्णपणे समाजासाठी वेळ देत ते जगत आहेत.
साजिद यांचा जन्म बेळगावचा, त्यांचे शिक्षण मात्र विजापूरच्या सैनिक शाळेत झाले. लहानपणी सैनिकी शिष्टाचाराचे धडे गिरविलेल्या साजिद यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण घेऊन बेळगावला परतल्यानंतर थेट सामाजिक उपक्रमात उडी घेतली.
त्यावेळी बेळगावात बेरोजगार तरुणांची संख्या मोठी होती. त्यांनी असे तरुण जमवून त्यांना ऑटो रिक्षासाठी कर्जे मिळवून देण्यास सुरुवात केली. मुस्लिम युवकांच्या संघटना उभारून घरगुती आणि सार्वजनिक पातळीवर स्वच्छता गृहे उभारण्यास प्रारंभ केला. स्वच्छता आणि आरोग्य सेवा यावर भर देऊन गांधीनगर सारख्या विभागात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले. गँगवाडीत मुस्लिम मोहल्ल्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले.
पाण्याला रंग असत नाही तसं प्रेमाला ही रंग असू नये पाणी कस पवित्र आणि शुद्ध असत तस आपल प्रेम देखील शुद्ध असुदेत या सारखंच दोन्ही मराठी आणि मुस्लीम समाजातील मैत्री अखंड नांदावी शहरातील सुख शांती आणि समाधान कायम टिकाव यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात .बेळगावातील मराठी क्रांती मोर्चात मराठी मुस्लीम ऐक्यात साजिद भाई याचं योगदान अनमोल होत.
आज त्यांच्या कामाचा विस्तार वाढला आहे. विविध सरकारी योजनांची जागृती करून त्या मिळवून देण्यासाठी ते झटत राहतात. कोणतेही पद किंवा स्वार्थ न ठेवता त्यांची धडपड सुरू आहे. आपल्या प्रयत्नातून त्यांनी असंख्य युवकांना सरकारी सेवांचा लाभ घडवून दिला आहे.
बेळगाव शेतकरी संघटना, भ्रष्टाचार निर्मुलन संघटना, बांधकाम कामगार संघटना, मानव सेवा संघ आदींच्या माध्यमातून त्यांचे काम सुरु आहे. त्यांच्या कार्याला बेळगाव live चा सलाम.
साजिद सय्यद- मोबाईल ०८८६७३८८९०१