चंदगड दि 24-चॅन हलकर्णी इथल्या दौलत न्यूट्रीयन्स अॅग्रो या कारखान्याने एफआरपी प्रमाणे शेतक-यांचे ऊस बिलाचे थकवलेले २४ कोटी ३९ लाख रूपये त्वरीत द्यावे, या मागणीसाठी आज शिवसेनेने मोर्चा काढून साखर सहसंचालक कार्यालयावर हल्लाबोल केला. शेतक-यांची थकीत रक्कम येत्या आठ दिवसात दिली नाही तर कारखान्याची साखर जप्त करू, असे आश्वासन यावेळी साखर सहसंचालकांनी दिले.
चंदगड इथल्या दौलत सहकारी साखर कारखाना हा दौलत न्युट्रीयन्स अॅग्रोकडून चालवण्यात येत आहे. या कारखान्याने सन २०१६-१७ मध्ये १ लाख ३९ हजार ६७२ टन इतके ऊसाचे गाळप केले आहे. आत्तापर्यंत ४ कोटी ९० लाख रूपये शेतक-यांच्या खात्यावर जमा केले आहेत. अद्यापी २४ कोटी ३९ लाख रूपये थकीत आहेत. शेतक-यांचे हे देणे त्वरीत द्यावेत या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने कोल्हापूरातील साखर सहसंचालक कार्यालयावर निर्धार मोर्चा काढण्यात आला होता. कार्यालया बाहेर हा मोर्चा अडवण्यात आला. यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिक आणि शेतक-यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलीसांचे कडे तोडून त्यांनी कार्यालयात प्रवेश केला. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बरीच झटापट झाली.
त्यानंतर कार्यकर्त्यांनी साखर सहसंचालकांना निवेदन देवून चर्चा केली. थकीत रक्कम मिळाली नाही तर कारखान्याबाहेर साखर सोडली जाणार नाही, असा इशाराही यावेळी दिला. ऊस गाळपानंतर सात दिवसात शेतक-यांना एफआरपी प्रमाणे रक्कम देण्याचा नियम असताना गेल्या तीन महिन्यात दौलत अॅग्रोवर कारवाई का केली नाही, अशी विचारणा करत साखर सहसंचालकांना धारेवर धरले. तर येत्या आठ दिवसात शेतक-यांचे एफआरपी प्रमाणे देणी दिली जातील. जर कारखान्याने देणी दिली नाहीत तर त्यांची साखर जप्त करण्याची कारवाई करू, असे साखर सहसंचालकांनी सांगितले.
या आंदोलनात जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार, उप जिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर ,सहसंपर्क प्रमुख सुनिल शिंत्रे, संघटक संग्राम कुपेकर, अशोक मनवाडकर, शांता जाधव, भरमण्णा गावडा प्रताप उर्फ पिणु पाटील, अनिल दळवी, भारत चव्हाण, युसूफ पठाण आदीं सहभागी झाले होते.
Trending Now