Sunday, November 17, 2024

/

गर्भिणी-आहार- वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

 

नवविवाहित दाम्पत्याला नेहमीचं आपले बाळ हे सुदृढ आणि निरोगी असावे असे वाटते . आता तर अति स्पर्धेच्या युगात ते जिनियस हवे असेचं वाटल्यास त्यात काही वावगे नाही . आता प्रश्न हा आहे कि खरेचं हे शक्य आहे का आणि असल्यास कसे ? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे हो अशीच आहेत . आता दिवस गेल्यापासून प्रसूती होईपर्यंत काय काळजी घेतली तर असे निरोगी बाळ जन्माला येईल ते सविस्तर पाहू यात .

दिवस राहणे हि प्रत्येक स्रिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची आणि अविस्मरणीय घटना असते. दिवस राहिल्याची नुसती कुणकुण लागली तरी आपल्या येणाऱ्या बाळासाठी काय करू आणि काय नको असे तिला होऊन जाते . जिथून जिथून माहिती मिळेल ती घेणे , आपल्या मोठ्या बहिणींना विचारणे , आपल्या आईशी विचारविनिमय करणे, मैत्रिणींचा सल्ला घेणे असे चालू होते . काहीही करतांना याचा आपल्या बाळाला त्रास तर होणार नाही ना याची मनात सतत धास्ती पण राहते .कारण खरेच आईच्या शारीरिक आणि मानसिक परिस्थितीचा पूर्ण परिणाम गर्भावर होत असतो .कारण गर्भाच्या श्वसन, पचन, रक्ताभिसरण अशा सर्वच क्रिया आईच्या क्रियांबरोबरच होत असतात . त्यामुळे काळजी वाटणे अगदी रास्तच आहे. गर्भावास्थेतल्या अभिमन्यूची गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहेचं . मग आई म्हणून आपली जबाबदारी अजूनच वाढते . पण त्याचा आई म्हणून ताण घेणे अगदी चुकीचे आहे . उलट डोळे उघडे ठेऊन आपले आचरण करणे गरजेचे आहे . कारण गर्भाची पूर्ण वाढ हि आईच्या खाण्यापिण्यातून मिळणाऱ्या पोषणावर अवलंबून असते . त्यामुळेच आईचा आहार चौरस असावा . म्हणजे त्यात वरणभात , भाजीपोळी , कोशिंबीर, आमटी, ताक , पातळ भाजी असा सर्व समावेशक असावा . एकांगी नसावा . म्हणजे जेवण म्हणून फक्त पोहेचं वगैरे खाल्ले असे नसावे . बाळाच्या वाढीसाठी लागणारी सर्व पोषक द्रव्ये आईच्या खाण्यातूनच बाळापर्यंत पोचत असतात .म्हणूनच आईच्या आहारात कोणत्याही गोष्टींची कमतरता असता कामा नये . आत्ताच बाळाची प्रकृती तयार होत असते . त्यामुळे आत्ता काळजी घेणे जास्त संयुक्तिक आहे . प्रत्येकीला वाटते कि आपले बाळ अतिशय हुशार असावे . अगदी बरोबरच आहे . पण त्याबरोबर ते निरोगी आणि काटक असावे असे पण वाटायला हवे . आईने आत्ता घेतलेली काळजी हिचं बाळाची आयुष्यभराची शिदोरी असते. एकदा तयार झालेल्या प्रकृतीत नंतर कोणत्याही परिस्थितीत बदल होऊ शकत नाही . अर्थात निसर्गतःच स्रियांच्या ठिकाणी ममत्व जास्त असतेच . त्यामुळे आपल्या येणाऱ्या बाळासाठी तर त्या जास्तचं जागरूक असतात . बरेचदा नीट माहित नसल्यामुळे व्यवस्थित काळजी घेतली जात नाही . तर त्यासाठीचं हा ब्लॉग !! नेमके काय केले म्हणजे आपले बाळ निरोगी आणि सुदृढ जन्माला येईल आणि आई म्हणून आपली तब्येत पण छान राहील याचा विचार आपण इथे करणार आहोत . या अतिशय सुखकारक अशा प्रक्रियेचा पुरेपूर आनंद उपभोगता यावा आणि निरोगी व सुदृढ अपत्य मिळावे यासाठीच्या काही महत्वाच्या गोष्टी आपण बघू यात .

गर्भिणीची तब्येत अतिशय नाजूक झालेली असते. एखाद्या पूर्णपणे काठोकाठ भरलेल्या तेलाच्या भांड्याची जशी आपण काळजी घेऊ तशीच गर्भिणीची घेतली पहिजे. गर्भिणीच्या आहारविहाराबाबत विचार करतांना त्यात प्रामुख्याने या खालील गोष्टी जास्त महत्वाच्या असतात . —

. उदरस्थित गर्भाचे पोषण व्यवस्थित होणे .

. आईची तब्येत पुढील प्रसूती आणि माता या दोन अवस्थांसाठी तयार करणे .

. आईला शक्यतो व्याधींपासून दूर ठेवणे .

गर्भिणीची अवस्था अतिशय नाजूक असल्याने काही व्याधी ( उदा . – उलट्या होणे , पोट साफ न होणे , मळमळणे , पाय दुखणे इ . . ) आल्यास शक्यतो नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा . मनाने औषधे घेणे कटाक्षाने टाळावे . आईच्या आजारपणाचा व त्यात घेतल्या जाणाऱ्या औषधांचा परिणाम गर्भावर पण होत असतो याचे भान आपण ठेवायला हवे .गर्भाच्या निरोगीपणासाठी गर्भिणीची तब्येत निरोगी असणे अतिशय आवश्यक आहे . त्यामुळेच या काळात तिला फारशी दुखणी येऊ नयेत म्हणून तिचे खाणेपिणेवागणे अतिशय काटेकोर असणे आवश्यक आहे . आता आपण प्रथम खाण्याबाबत बघू

काय खाल

दिवस राहिल्यापासून खाण्यात दुध, तूप, लोणी यांचा समावेश असणे आवश्यक आहे . कारण या सर्वांमुळे गर्भाची आणि आईची ताकद चांगली राहते . एकट्या आईच्या खाण्यावरच दोन जीवांचे ( आई आणि उदरस्थ गर्भ ) पोषण अवलंबून असते . त्यामुळे आईच्या सर्व अवयवांना जास्त पोषणाची गरज असते. त्यामुळेच जास्त पोषण अंश असलेले पदार्थ खाणे आवश्यक आहे . सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसभरात एक कप तरी दुध पिणे आवश्यक आहे . त्याने मानसिक आणि शारीरिक ताकद चांगली राहते .दुध गर्भाच्या वाढीला कारणीभूत ठरते . दुध आवडत नसल्यास दुधभात खावा . रव्याची / शेवयाची पातळ खीर खायला हरकत नाही . दुधाचा वास आवडत नसल्यास वेलदोडा , शतावरी कल्प, केशर असे घालून दुध घ्यायला हरकत नाही .दिवसभरात चार वेळा खाणे गरजेचे आहे . सकाळी नाष्टा , दुपारी जेवण , संध्याकाळी थोडे खाणे आणि रात्रीचे जेवण . असे विभागून खाण्यामुळे अजीर्ण होत नाही . अन्नाचे पचन चांगले होऊन गर्भाची वाढ व्यवस्थित होते . बाजारातील पदार्थांपेक्षा घरी बनवलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा .त्यात पोषण अंश जास्त असतात . तसेच ते जास्त आरोग्यदायी असतात . जर कामानिमित जास्त काळ बाहेर रहायला लागणार असेल आणि घरचे पदार्थ नेणे शक्य नसेल तर अशा वेळी लाह्या , लाडु , विविध फळे, सुकामेवा बरोबर ठेवावा . सुकामेवा खाण्यात असावा . पण तो जातायेता असा कधीही खाऊ नये. त्याची एक वेळ ठरवावी . शक्यतो सकाळी अनशापोटी खावा . त्यात एक बदाम, /४ मनुका, सुके अंजीर , अक्रोड ,जर्दाळू यांचा समावेश असावा. सकाळी नाष्टा आणि सुकामेवा असे एकावर एक होणार असेल तर सुकामेवा संध्याकाळी खायला हरकत नाही . पण जी एकवेळ ठरवू ती कायम असावी . जेवण द्रवाप्राय असावे . म्हणजे जेवणात आमटी, कढी , ताक , पातळ भाजी , रसभाजी असे ओलसर जेवता येतील असे पदार्थ असावेत . यामुळे रक्ताभिसरण चांगले होते . दोन्ही पैकी एका जेवणात तरी वरणभात , तूप ,लिंबू असावा . मांसाहार करणारे नसाल तर वरण जेवणात असणे अतिशय आवश्यक आहे . पोटाला तडस लागेल एवढे जेऊ नये . त्यामुळे पचन नीट होत नाही . पोटाला जडपणा येतो . खाल्लेले अंगी लागत नाही . जेवणानंतर थोडी शतपावली घालावी . जेवल्याजेवल्या लगेच झोपू नये . जेवणानंतर शतपावली घातल्याने रक्त चांगले सकस तयार होते कि जे गर्भाच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरते . जेवणात तुपाचे प्रमाण छोटे २चमचे इतके दिवसभरात असावे . तुप हे बुध्दिवर्धक आहे . त्याचा निश्चित फायदा होतो . जेवणात भाताइतकेच महत्व पोळी आणि भाकरीला पण आहे . याने कणखरपणा येतो . त्यामुळे दोन वेळचे वरणभातभाजीपोळी असे जेवण अगदी गरजेचे आहे . त्यासाठी कोणताही पर्याय नाही . ऋतूनुसार मिळणारी ताजी फळे खावीत . ती संध्याकाळच्या वेळी खायला हरकत नाही . कच्चे गाजर , काकडी , टोमाटो , बीट , मुळा असे चालेल . पण त्यावर चाट मसाला नको. त्याऐवजी आपल्या सर्व कोशिंबीरी चालतील . आवडत असेल ते सर्व काही चालेल पण त्यात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको . ऋतुनुसार आणि तहान लागेल तसे पाणी प्यावे . विनाकारण पाणी पिणे चांगले नाही .

काय खाणे टाळाल

मसालेदार, तेलकट आणि चमचमीत पदार्थ शक्यतो टाळावेत . पचायला जड असे खव्याचे पदार्थ, पक्वान्ने वारंवार खाऊ नये. बाहेरचे खाणे शक्यतो टाळावे . भूक नसल्यास खाऊ नये . दुध आणि फळे असे एकत्र करून खाऊ नये . कोल्ड ड्रिंक्स नको. त्याऐवजी ताजी सरबते चालतील . शहाळ्याचे पाणी चालेल . लोणचे प्रमाण जास्त नको. ते लोणच्या इतकेच असावे . वरून मीठ घेणे टाळावे . केळे आणि दही याचे प्रमाण कमी असावे . घरात कोणाला वारंवार सर्दी किंवा दम्याचा त्रास असेल तर हे हमखास टाळावे . पूर्ण वर्ज्य असे

पपई आणि अननस अजिबात खाऊ नये . कलिंगड पण शक्यतो टाळावेच . डिंक , अळीव हे प्रसुतीनंतर खायचे असते . यामुळे अंगावर दुध चांगले येते . पण गर्भावस्थेत असतांना बाळाच्या पोषणासाठी त्यांचा उपयोग होत नाही . म्हणून ते टाळावे . याचप्रमाणे खारीक खाणे पण टाळावे . उष्ण तीक्ष्ण पदार्थ खाऊ नयेत . उदा . — लसूण , मिरे मद्यपान करू नये . कोणतेही व्यसन असल्यास ते या काळात जरा लांब ठेवावे . काही त्रास असला तरी कोणत्याही परिस्थितीत शेकू नये . पाचवा महिना पूर्ण होईपर्यंत मसाज किंवा अंगाला तेल लावणे टाळावे .

कसे वागाल

पोटावर झोपू नये. अतिश्रम टाळावेत . साधारण ३ महिने पूर्ण होईपर्यंत जास्त काळजी घ्यावी . त्यानंतर गर्भाला स्थिरीकरण आलेले असते . त्यामुळे एवढी चिंता नसते. तसेच आठवा महिना पण जास्त जपावा . त्यावेळी गर्भाची जास्तीत जास्त वाढ होत असते . म्हणून त्याही महिन्यात जास्त विश्रांती घ्यावी . कारण आठव्या महिन्यात दगदगीमुळे प्रसूती झाल्यास ती आई आणि बाळ या दोघांनाही त्रासदायक अशी कदाचित जीवावर बेतणारी ठरू शकते. त्यामुळे आठव्या महिन्यात उत्साह वाटला तर काम करावे अन्यथा विश्रांती घ्यावी. नववा महिना लागल्यावर मात्र आपल्या तब्येतीनुसार थोडे थोडे शारीरिक श्रमाचे काम करायला हरकत नाही . यावेळेपर्यंत बाळाची वाढ बरीचशी पूर्ण झालेली असते . आता प्राकृत प्रसव होण्यासाठी वाताचे चलनवलन योग्य असणे गरजेचे असते. त्यासाठी थोडी हालचाल वाढवणे आवश्यक असते. .भीतीदायक सिनेमे, गोष्टी पाहू नयेत. ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या कटाक्षाने टाळाव्यात . नेहमीचे काम करायला हरकत नाही,पण त्याचा मानसिक ताण येणार असेल तर ते टाळावे . हलकासा व्यायाम करायला हरकत नाही . थोडे चालणे ठेवावे . जोरजोरात बोलणे, भांडण करणे , रडणे , एखाद्या गोष्टीचा मनस्ताप करून घेणे अशा गोष्टी टाळाव्यात. मल मूत्र विसर्जन वेळच्या वेळी करावे . रात्री जागरण व दिवसा झोप टाळावी . वाहन प्रवास , वेडेवाकडे बसणे शक्यतो टाळावे . उपवास जास्त करू नयेत . शक्यतो कोणत्याही कारणास्तव उपाशी राहू नये . ओझे उचलू नये . पोट दाबले जाईल असे काही करू नाही . वेडीवाकडी आणि शरीरावर ताण पडेल अशी शरीराची हालचाल करू नये .

मानसिक आरोग्य

गर्भिणीने आपले मानसिक आरोग्य राखणे अतिशय गरजेचे आहे . आपल्या बाळासाठी तिच पहिली गुरु असते .त्यामुळे तिचे वागणे अतिशय आदर्श असायला हवे. उदरस्थित असल्यापासून बाळ फक्त आपल्या आईला ओळखत असते . गर्भावस्थेत असल्यापासून त्याला फक्त आपल्या आईचे हृत्स्पंद ( heart bits ) परिचित असतात . त्यामुळेच ते आपली आई बरोबर ओळखते . म्हणूनच रडायला लागल्यावर आईने छातीशी घेतल्यावर ते कितीही रडत असले तरी शांत होते . कारण त्याला परिचित असे हृत्स्पंद त्याच्या कानावर पडतात आणि त्याला आपण सुरक्षित असल्याची ग्वाही मिळते . अशा आपल्या चाणाक्ष बाळांसाठी आपली आई म्हणून मानसिकता तयार होणे अतिशय आवश्यक असते. खरे तर स्त्रियांकडे हि ताकद उपजतच असते, पण अलीकडे स्त्रिया बाहेर काम करायला लागल्यामुळे त्यांच्यावर बाकी ताण पण जास्त प्रमाणात पडायला लागले आहेत. त्यामुळे त्यांची सहनशक्ती कमी पडायला लागली आहे . थोड्या प्रमाणात चीडचीड वाढली आहे . या काळात तीच नको आहे . त्याचा पडसाद गर्भावर उमटणार आहे . अशा गोष्टी टाळायला हव्यात कि ज्यामुळे आपली चीडचीड होईल . मन शांत , प्रसन्न आणि आनंदी असायला हवे. मनाचे विचार नेहमी सकारात्मक असायला हवेत . अर्थात हे आपण अगदी सहज करू शकतो. ते अशा पध्दतीने—–

दिवसभरात एकदा १० मिनिटे डोळे मिटून अगदी शांत बसावे . श्वास हळुहळू घेऊन हळुहळू सोडवा . कोणत्याही आपला विश्वास असणाऱ्या देवाचे श्लोक किंवा स्तोत्र म्हणावे . उदा . – रामरक्षा , गणपती स्तोत्र , मारुती स्तोत्र , अथर्वशीर्ष वगैरे आपल्या आवडीचा छंद जोपासावा . उदा . – भरतकाम, विणकाम , चित्र काढणे, पेंटिंग , काही वाद्य वाजवणे छान पुस्तके वाचावीत . आपल्या आवडीचे आणि आपले मन प्रसन्न करणारे सर्व काही करावे . महिन्यानुसार खाणे

प्रत्येक महिन्यात गर्भाची ठराविक पध्दतीने वाढ होत असते. त्या अनुषंगाने खाण्यात काही ठराविक पदार्थ ठेवल्यास त्याचा निश्चितच चांगला परिणाम दिसून येतो. आता महिन्याच्या क्रमाने आपण ते पदार्थ बघू यात.

पहिला महिनासाधे ऋतुमानानुसार कोमट किंवा गार दुध पिण्यात असावे . त्यात आटवलेले दुध किंवा तसे दुधाचे पदार्थ नकोत. दुसरा महिनाशतावरी कल्प घालून दुध प्यावे . रव्याची किंवा तांदुळांच्या कण्यांची दुध, तूप आणि साखर घातलेली खीर घ्यावी . तिसरा महिनादुध, तूप आणि थोड्या प्रमाणात मध खाण्यात असावा . या तिघांचे एकत्र मिश्रण अपेक्षित नाही . तर जेवणात तूप घ्यावे . साध्या नेहमीच्या तापमानाच्या दुधात पाव चमचा मध घालून घ्यायला हरकत नाही . चौथा महिनाताजे घरचे काढलेले लोणी खाण्यात असावे . पण ते रोज फक्त अर्धा चमचा इतकेच असावे . पाचवा महिना दुध आणि तूप खाण्यात असावे . दुधभात खाण्यात असावा . सहावा महिना शतावरी कल्प घालून दुध प्यावे . सातवा महिना शतावरी कल्प घालून दुध प्यावे . लोणी खाण्यात असावे . तूपभात खावा . आठवा महिना तूप घालून मुगाचे कढण , भाज्यांचे सूप असे खाण्यात असावे . भाताची पेज तूप घालून खावी . नववा महिना तूप जास्त खाण्यात असावे . भरपूर तूप घातलेली रव्याची किंवा तांदुळांच्या कण्यांची लापशी खावी . वर जे पदार्थ महिन्याच्या अनुषंगाने सांगितले आहेत, ते त्या त्या महिन्यातील गर्भाच्या वाढीचा विचार करून सांगितले आहेत . म्हणजे नेहमीच्या जेवणाबरोबर किंवा खाण्याबरोबर हे पदार्थ असावेत . त्यांचा अतिरेक नसावा . कारण अतिरेकामुळे जर काही दुखणे आले तर त्याचा त्रास गर्भिणी आणि गर्भ या दोघांनाही भोगावा लागतो .

जास्त महत्वाचे

गर्भ मातेच्या उदरात वाढत असतो, त्यामुळे निश्चितचं तिची जबाबदारी जास्त असते . यात काही वादच नाही . पण तितकीच जबाबदारी तिच्या घरच्यांची विशेषतः तिच्या पतीदेवांची असते . या काळात घरातील वातावरण आनंदी असायला हवे . गर्भिणीच्या मनावर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही याची काळजी घरातील प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे .जसे तिच्या खाण्यापिण्यावर गर्भाचे पोषण अवलंबून असते , तसेच तिच्या मानसिकतेवर गर्भाची मानसिकता अवलंबून असते . त्यामुळे तिच्यासकट सर्वांनीच या गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात . या काळात तिची जशी मानसिकता असेल तशीच हुबेहूब बाळाची होते . तिने सतत आनंदी राहायला हवे . चांगले विचार करायला हवेत . चांगल्या राष्ट्रपुरुषांची चरित्रे वाचावीत . साधूसंतांचे चरित्र वाचावे . मनातील सात्विक विचार वाढतील असा प्रयत्न करायला हवा . द्वेष, मत्सर, संताप, असत्य वचन ,अहिंसा अशा गोष्टींना थारा देऊ नये . नेहमी सदाचारी असावे .

अशा तह्रेने योग्य ती काळजी डोळे उघडे ठेवून घेतली तर निश्चितचं सुदृढ आणि निरोगी बाळ जन्माला येईल यात काही वादच नाही .

Dr sonali sarnobat
Sarnobat’s Homeopathic research centre and
Multyspeciality Homeopathy
09916106896
099649 46918

dr sonali sarnobat

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.