बेळगाव दि १०: मराठी क्रांती मोर्चा च्या निमित्ताने बेळगावात “मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे ” अश्या आशयाचा मजकूर असलेला टी शर्ट विकणाऱ्या कोल्हापूरच्या युवकावर दोन भाषिकात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मूळचा सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावचा रहिवाशी असलेल्या शहाजी भोसले वय २५ अस त्या युवकाच नाव असून त्याच्यावर बेळगावातील खडे बाजार पोलिसात आय पी सी १५३ अ अंतर्गत दोन भाषिकात तेढ निर्माण करणे असा गुन्हा नोंद करण्यात आलाय. मराठी क्रांती मोर्चाच्या निमित्ताने बेळगावात महाराष्ट्रातील अनेक युवक रोजंदारी साठी टी शर्ट टोप्या झेंडे आणि इतर साहित्य विकण्यासाठी आले आहेत.
शुक्रवारी दुपारी संभाजी चौकात शहाजी हा टी शर्ट विकत होता त्याला खडे बाजार पोलीस निरीक्षक यु ए सातेनहळळी यांनी ताब्यात घेतल आणि सांयकाळी गुन्हा नोंद करून कारागृहात रवानगी केली . टी शर्ट विकणाऱ्या युवकास अटक केल्याने कर्नाटक पोलिसात किती दडपशाही करत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालय. शुक्रवारी दुपारी अड सुधीर चव्हाण शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर, बंडू केरवाडकर सह एकीकरण समितीच्या नेत्यांनी पोलीस निरीक्षक सातेनहळळी यांची भेट घेऊन भोसले याला सोडविण्याची विनंती केली मात्र पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्यास अटक केली.