Thursday, January 9, 2025

/

महाराष्ट्रातला मराठा मोर्चा बेळगावात कसा झाला मराठी मोर्चा “बेळगाव लाईव्ह” विशेष संपादकीय जरूर वाचा …”प्रवास मराठा ते मराठी”

 belgaum

प्रवास मराठा ते मराठी

१७ फेब्रुवारी हा दिवस बेळगावच्या इतिहासात महत्वपूर्ण असेल. या दिवशी भारतातला साठावा आणि सीमाभागातील पहिला वहिला मराठा क्रांती मोर्चा होणार आहे. कर्नाटकाच्या जोखडात अडकलेला सीमाभाग महाराष्ट्रात सामील करा या मागणीचा प्रमुख समावेश झाल्याने या मोर्चाचे स्वरूप मराठा आणि मराठी क्रांती मोर्चा असे बनले.सीमाभागात मराठा या शब्दाचा अर्थ सर्वसमावेशक मराठा असा आहे यामुळे हा मोर्चाही तितकाच सर्वार्थाने समावेशक असेल यात शंका नाही.

महाराष्ट्रात मराठा क्रांतीची मशाल मागील वर्षी पेटली. अनेक वर्षांपासून जातीव्यवस्थेच्या एका मानाच्या टोकावर आरूढ झालेल्या या समाजाला सामाजिक अंतर त्रासदायक ठरत होते. यामुळेच ठिकठिकाणी प्रचंड मूक क्रांती झाली. त्या शिस्त बद्ध क्रांतीने देशभरातील राजकारण ढवळून निघाले. एका असाह्य तरुणीवर झालेल्या बलात्काराची, सरकारी नोकऱ्यात आणि शिक्षण प्रवेशात होण्याऱ्या उपेक्षेची ती चीड होती. कोल्हापुरात झालेला मोर्चा तर गरम डोक्याच्या माणसांनीही अगदी शिस्त बद्ध करून दाखवला. यात सीमाभागातील मराठी माणसाचा सहभाग होता. एका उदात्त हेतूने होणाऱ्या या क्रांतीत आपणही महाराष्ट्राचे असे मानणाऱ्या सिमावासीय मराठी माणसाने तेथे जाऊन आपल्या अस्तित्वाची साक्ष नक्कीच दिली.

एकंदर परिस्थितीत कर्नाटकातील मराठा मोळ्या बेळगावात मराठा मोर्चा करण्याचे नियोजन सुरू झाले तेंव्हा येथील मराठीजन नक्कीच भारावले होते. नियोजनात मराठा मोर्चा व्हावा मात्र सीमाप्रश्न वगळून असा सूर काहींनी लावल्याने मात्र काहीशी माशी शिकली होती. त्यालाही कारण होते, कर्नाटकात मराठी भाषिक मराठा सीमाभागात मोठ्या संख्येने रहात असला तरी मराठा क्रांतीत सर्व भाषिक मराठा समाजाचा सहभाग असावा अशी अटकळ होती. ही अटकळ सीमावासीयांना दुखवणारी ठरली. शिवाय राजकीय पक्ष्यांच्या गळात अडकलेल्या काहीना सीमाप्रश्न वगळून आपली राजकीय गणिते साधायची होती हे ही या ना त्या कारणाने उघड झाले.

आता दि १७ चा मोर्चा मराठा व मराठी क्रांतीचा असणार आहे. यात सीमाप्रश्नाचा मुद्दा प्रमुख आहे. समिती नेते आणि कार्यकर्ते जीवापाड मेहनत घेताहेत. पूर्वीच्या आयोजकांनी आपला मोर्चा मागे घेऊन या मोर्चाला शुभेच्छा दिल्या आहेत. सीमाप्रश्न ज्यांना नको होता ते आता बाजूला पडलेत. महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि बेळगाव खानापूर कारवार निपाणी बिदर  भालकी चा मराठी माणूस या मोर्चात दिसेल हि काळ्या दगडावरची रेघ आहे.

स्वतःला मराठा आणि मराठी मानणाऱ्या तसेच बेळगाव सहीत सीमाभाग महाराष्ट्रात जावा ही मागणी मानणाऱ्या प्रत्येकाचा हा मोर्चा…, सिमभागाच्या आंदोलनीय इतिहासात एक मैलाचा दगड नक्कीच ठरणार यात शंका तीळमात्र नाही .

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.