बेळगाव दि २४ : जार्किहोळीच्या गटात शिरलेला सत्ताधारी गट तुम्हाला अमान्य आहे, माजी महापौरांनी काळा दिन आणि इतर सीमावासीयांच्या लढ्यात केलेली आगळीक तुम्हाला बोचतेय, परवा परवा एपीएमसी मध्ये झालेले राजकारण तुम्ही मनावर घेतले आहे, हे सारे जरी मान्य असले तरी मराठी नगरसेवकांनो तुम्हाला सीमाप्रश्नाची शपथ आहे, यावेळी महापालिकेत मराठीच महापौर आणि उपमहापौर करा .
बेळगावची महानगरपालिका म्हणजे सीमावासीयांचा केंद्रबिंदू आहे, इतर ठिकाणी काय झाले हे माहित नाही पण महानगरपालिकेत काहीही कन्नड धार्जिणे झाले की फरक पडतोच, आणि हा फरक पडला की तमाम सीमावासीयांच्या इज्जतीवर टाच येते, तुम्ही म्हणाल कसली इज्जत म्हणून, तुम्हाला वैयक्तिक स्वरूपात ती नसेल पण तसे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही कारण मराठी मतांवर तुम्ही निवडून आला आहात.
ज्या महानगरपालिकेच्या सत्तेची गणिते तुम्ही खेळता आहात तिची पायरी तुम्हाला मराठी जनांनी दाखवून दिली आहे, याचे भान तुम्ही बाळगायला हवे, तुमची मुले शाळेला जात असतील तर त्यांना तुम्ही सांगत असाल की बाळांनो कोणत्याही स्पर्धेत आपला समूह विजयी व्हायचा असेल तर वैयक्तिक स्वार्थ सोडायला हवा. मग वैयक्तिक स्वार्थापोटी तुम्ही जे करीत आहात ते तुमच्या मुलाबाळांना सांगून पहा, तीच सांगतील पप्पा मम्मा हे बरे नाही कारण प्रश्न अस्मितेचा आहे. आणि हो सीमाभागालाही हे तुमचे वागणे रुचणारे नाही.
मराठी आपली मायबोली, मराठी आमचा स्वास् हा एकच ध्यास घ्या आणि लागा तयारीला, जे चुकीचे वागले त्यांची बात सोडा तुम्ही चुकीचे वागू नका, नाहीतर सीमाप्रश्नासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांचे आत्मे तळमळल्याशिवाय राहणार नाहीत.