१६ रोजी होणारा बेळगावातील मराठा मोर्चा समस्त मराठी क्रांतीची मशाल चेतविणार आहे. अतिशय शिस्तबद्ध, संयमाने आणि शांततेत होणारा, पूर्णपणे मूक मोर्चा बेळगावात इतिहास घडवणार आहे. यासाठी उठ मराठ्या जागा हो अन अतूट क्रांतीचा धागा हो असेच म्हणण्याची वेळ सध्या आली आहे.
मराठा हा समस्त मराठी भाषिकांना सामावून घेणारा शब्द आहे. मराठी असे आपली मायबोली असे म्हणत मराठीची जपणूक करण्यासाठी मराठ्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवरायांच्या आदर्शांचे पूजन करीत आजवर मराठे आपला देशकार्यातील सहभाग दर्शवित आले आहेत. आणि यामुळेच बेळगावातील क्रांती मोर्चाला अनुसूचित जाती जमातींपासून सर्वच समाजांनी आपला पाठिंबा दिला आहे, मोर्चाची ताकत वाढविणारीच ही बाब आहे.
बेळगावात सारे जाती बांधव गुण्यागोविंदयाने वागतात. फक्त निवडणुकी पुरते राजकारण आणि इतर वेळी सारे एकत्र असे येथील नातेसंबंधांचे स्वरूप आहे. मराठी माणूस महाराष्ट्रात जाण्याचा आग्रह करतो म्हणून तो काहीवेळा राष्ट्रीय पक्षांच्या नजरेत खुपतो, मात्र गरजेला आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला तोच लागतो. बेळगावची मनपा असो तालुका पंचायत की इतर गावोगावच्या ग्रामपंचायतींपर्यंत मराठी माणूसच सत्तेवर आहे. मात्र अधिकार आहे म्हणून स्थानिक कन्नड लोकांना तो कधीच त्रास देत नाही.
राज्य पुनर्रचनेत मुंबई प्रांतातले बेळगाव आणि ८६५ खेडी कर्नाटक प्रांतात अडकविण्यात आली आहेत.यामुळे चीड आहे मात्र याविरोधातही लोकशाही मार्गाने लढा सुरु आहे. मराठी माणसाने कधीच कायदा हातात घेतलेला नाही.
या मोर्चालाही अडवणूक होत आहे, पोलीस केसीस आणि इतर बरंच काही घडत राहील. संयोजक, नियोजक आणि इतर संबधितांना रोखण्याचे ना ना यत्न होतील, संयम राखायला हवा हीच खरी गरज आहे, सगळ्या बरोबर बेळगाव लाईव्ह देखील आवाहन करत आहे इतिहास घडवायचा असेल तर सगळ्यानी आचार संहितेच तंतोतंत पालन करण गरजेच आहे .
चला तर मग
जागे होऊया
बलशाली बनुया
क्रांती जगवूया.
चला उठा इतिहास घडवूया !!!
उठ मराठ्या जागा हो, अतूट क्रांतीचा धागा हो
मस्त अग्रलेख, अभिनंदन