मराठा आणि मराठी मोर्च्याच्या बाबतीत १७ की १९ हा वाद मिटला आहे. १९ च्या संयोजकांनी मोठे मन दाखवून थेट पोलीस आयुक्तांना आपला अर्ज मागे घेतल्याचे पत्र दिले. आणि १७ रोजी होणाऱ्या सीमाप्रश्नाची मागणी अग्रणी असणाऱ्या मोर्चाला पाठिंबा दिला. अगदी अल्पकाळात सोशल मिडीयावर प्रसिद्धी मिळवलेल्या बेळगाव लाईव्ह चा हा मोठा इम्पॅक्ट ठरला आहे. मराठे खेकडे नाहीत, ते युध्दातहि जिंकतात आणि तहातही हेच सिद्ध झाले आहे .
आयोजन आणि नियोजनात निर्माण झालेली अडचण आता दूर झाली. वाईट संदेश जात होता, तोही बाजूला पडला. बाब कोणतीही असो मराठा आणि मराठी एकमेकात भांडतात आणि नुकसान करून घेतात असे म्हणाऱ्यांची मुस्काटे आता बंद झाली आहेत. कुणाचे ऐकायचे हा सर्वसामान्यातला प्रश्न संपला. सीमाप्रश्नाच्या दृष्टीने एकीची वज्रमुठ आवळली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात एका प्रश्नासाठी किती मराठा आणि मराठी एकत्र रस्त्यावर येतात हेही दाखवून देता येणार आहे. अर्धा विजय झालाय आता दि १७ ला तो यशस्वीपणे साध्य करायचे तेवढेच शिल्लक राहिले आहे.
बेळगाव कडे नेहमीच साऱ्यांचे लक्ष असते. आमच्या तल्या फुटीचे चर्वण सारेच करत आलेत. एक क्रांती मोर्चा यांना एकत्रित करता आला नाही असे म्हणाऱ्यांनी आपले जबडे पसरण्याची तयारी केंव्हाच सुरु केली होतीच. ही बाब बेळगाव लाईव्ह च्या लक्षात आली होती. चुकीच्या बाजूने झुकणाऱ्या बाजूला सरळ करण्यासाठी काही प्रश्न उभे करावे लागले, त्याच दिवशी संपादकीय च्या माध्यमातून ते आम्ही सर्वत्र पोहोचविले, आज त्याचा चांगला परिणाम झाला हे आमचेच नव्हे तर साऱ्या समाजाचे यश मानायला हवे.
आता जबाबदारी मोठी आहे. बेळगावचे मराठा आणि मराठी एकत्रित आले म्हटल्यावर अनेकांना त्रास होणारच. त्यांच्या कुरबुरी वाढण्याचा धोका आहेच. आता मनात काहीच वेगळं न घेता साऱ्यांनी झटायचे आहे. मराठी जनांचा महासागर बेळगावच्या रस्त्यांवर १७ ला आणायचा आहे. विरोध करता येत नसल्याने मागून कुरबुरी करणाऱ्यांचे मनसुबे यात उधळून जातील. इतिहास बदलतोय नवे भविष्य घडविण्याचे काम सुरु आहे. लागा जोरदार तयारीला…….
क्रांतीची मशाल घेऊन आणि एकतेची कमान उभारून मराठा व मराठी मोर्चा यशस्वी करूया आणि इतिहास घडवूया !!!!