बेळगाव दि २३ : बेळगाव महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी मराठी गटात पडलेली फुट तशीच आहे . महापौर आणि उप महापौर निवडणुकीच्यावेळी शंभर टक्के आश्वासन देऊन ऐनवेळी आपल्या लोकांना महापौर आणि उप महापौर देण्याची खेळी खेळली गेली . त्यामुळे नाराज नगरसेवकाने मतदान देखील केले नाही . केवळ आपण सांगू त्याप्रमाणे व्हायला पाहिजे या अट्टाहासापोटी मराठी गटात उभी फूट पडली आहे . बावीस नगरसेवकांचा एक गट आणि नाराज दहा नगरसेवकांचा एक गट असे मराठी भाषिक नगरसेवकात दोन गट पडले आहेत . या फुटीमुळे विरोधी कन्नड उर्दू गटाला आता महापौर आणि उप महापौरपद आपल्याच गटाला अशी स्वप्ने पडू लागली आहेत . सत्तेच्या हव्यासापोटी मराठी भाषिकांनी आपल्याला कशाला निवडून दिले आहे याचाच विसर सत्तेची हाव असणाऱ्या मराठी भाषिक नगरसेवकांना पडला आहे . सीमाप्रश्नाचा ठराव महापालिकेत करण्याची मराठी नगरसेवकांची परंपरा थातुरमातुर कारणे देऊन बंद पाडवली.
त्या नाराज नगर सेवकाने कन्नड आणि उर्दू गटाशी संधान बांधून महापौर किंवा उपमहापौर एक पद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत .केवळ सहा दिवसाचा अवधी या निवडणुकीसाठी असताना सगळे गट तट विसरून एकत्र येण्याएवजी दोन्ही गटातील दुरी वाढतच आहे .
एकीकडे २२ नगर सेवकांच्या गटाने महापौर उपमहापौर निवडण्यासाठी पाच नगरसेवकांची समिती जाहीर केली असली तरी एकीसाठी अजून बैठका सुरु व्हायच्या आहेत. दहा नगरसेवकांच्या वतीने चर्चा करावयास गेलेले नगरसेवक मोहन बेळगुंदकर यांनी बेळगाव लाईव्ह दिलेल्या माहितीत सांगितले की दहा पैकी सात नगरसेवक त्या २२ जणा बरोबर बोलणी करायला इच्छुक आहेत मात्र दहा नगर सेवकांचे गट प्रमुख विनायक गुंजटकर , नागेश मंडोळकर आणि मीना वाझ २२ जणांशी चर्चा करायला तयार नाहीत. सत्तधारी गटावर या तिन्ही नगरसेवकांनी गंभीर आरोप केले असून गेल्या ३ वर्षात मनमानी कारभार, विश्वासात न घेणे,आपल्या मर्जीतील लोकांना पैसे घेऊन पद वाटले आहेत त्यामुळे कानडी गटाशी संधान साधून पद मिळवूया अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे एकी होईल का नाही याबाबत साशंकता आहे .
दुसरीकडे सत्ताधारी २२ नगरसेवकांच्या गटाने दहा नगरसेवकांच्या गटाशी चर्चा करायला संपर्क साधला असता आमदार महापौरा सह नगर सेवक विनायक गुंजटकर आपल्या केबीनमध्ये चर्चा करायला या असे मानापमान नाट्य करत असल्याने चर्चा फिस्कटली आहे . एकूणच गेल्या तीन वर्षात सत्ताधारी गटातील २२ नगरसेवकांचा गट चालविणाऱ्या गट नेता , आमदार आणि माजी महापौरांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे होते मात्र तसे न झाल्याने नाराज नगर सेवकांची संख्या वाढली आहे तर गुंजटकर,मंडोळकर आणि वाझ या तिघांनी इतका आततायी पणा करणे योग्य नव्हे असा देखील सूर उमटू लागला आहे . एकूणच सत्ताधारी नगरसेवकांची स्थिती आणि १० नगरसेवकांच्या गटाच्या नेत्यांची कन्नड गटाशी मिळते जुळते घेण्याची संशयास्पद भूमिका पाहता महापौर निवडणुकीत नक्कीच वाद होणार यात तीळ मात्र शंका नाही. शुक्रवार पासून पुन्हा बैठका होणार आहेत त्यामुळे पुढे काय होते ते बघणे महत्वाचे आहे.
एक व्हा अन्यथा जनता धडा शिकवेल
जस जस निवडणूक जवळ येऊ लागली आहे तस तसं शहरातील वातावरण देखील तापू लागल आहे २२ नगर सेवक आणि दहा नेगर सेवक असे दोन गटात विभागले गेलेले मराठी नगरसेवक एकी साठी माघार घ्यायला तयार नाही आहेत जर का पालिका निवडणुकीत संख्याबळ सत्ता असून देखील ए पी एम सी पुनरावृत्ती महा पालिकेत घडली तर सगळ्याच ३२ नगर सेवकांची खैर नाही जनता त्यांना कधीच माफ करणार नाही मराठी जनतेच्या उद्रेकास समोरे जावे लागेल अशी चर्चा आहे .
.