बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून गोकाक आणि चिकोडी या दोन शहरांना स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी केली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन विभाजनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी कर्नाटक सरकारला केले आहे.
आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी आज (मंगळवारी) बेळगाव येथे डीसीसी बँकेच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना जिल्हा विभाजनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला. त्यांनी स्पष्ट केले की, जिल्हा विभाजनासंदर्भात पूर्वी एका आयोगाने अहवाल दिला होता आणि त्या अहवालानुसार चिकोडी आणि गोकाक हे दोन स्वतंत्र जिल्हे व्हावेत, अशी शिफारस करण्यात आली होती.
यामुळे प्रशासकीय कारभार अधिक चांगला आणि सुरळीत देता येईल. या दोन नवीन जिल्ह्यांमुळे डीसीसी बँक ‘बीजीसी’ (बसवण्णा, गोकाक आणि चिकोडी) स्वरूपात विस्तारित होईल, तसेच दूध महासंघाच्या कारभारालाही अधिक गती मिळेल.

या भागातील ही मागणी जुन्या काळापासून प्रलंबित आहे. ब्रिटिश काळापासून बैलहोंगल येथे सहाय्यक आयुक्तांचे कार्यालय असले तरी, आयोगाच्या अहवालात चिकोडी आणि गोकाक या दोन शहरांना स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची शिफारस करण्यात आली होती.
जे.एच. पटेल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातही याची घोषणा झाली होती, मात्र राजकीय दबावामुळे तो निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे, आता आमदार, मंत्री आणि मठाधिपती यांसारख्या सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन सरकारने गोकाक आणि चिकोडीचे जिल्हा विभाजन तातडीने करावे, असे मत भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केले.



