बेळगाव लाईव्ह :सात दशकं पेटत्या मराठी अस्मितेच्या सीमालढ्यात स्वतःला अर्पण करणारे, ‘सीमा तपस्वी’ म्हणून ओळखले जाणारे, लढ्याचे अग्रणी माजी सत्याग्रही रामा शिंदोळकर (वय 86) यांचे 21 नोव्हेंबर रोजी रात्री निधन झाले. सीमा लढ्याचे केंद्रस्थान असलेल्या भूमीत जन्मलेल्या या योद्ध्याने अखेरचा “जय महाराष्ट्र” उच्चारत संघर्षाची मशाल सोपवली.
लढ्याचा प्रवास – कधीही न थकणारा…
सीमाप्रश्नावर अनेक आंदोलनं, मोर्चे, धरणे, उपोषणे झाली; परंतु प्रत्येक आंदोलनात उपस्थित राहणारे, अखेरच्या श्वासापर्यंत रस्त्यावर लढणारे शेलार मामा—रामा शिंदोळकर.
आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असतानाही मुंबईसह राज्यभर धावपळ करत त्यांनी सीमासंघर्षावरील आपली निष्ठा सिद्ध केली.
सीमाप्रश्नी आज पर्यंत अनेक आंदोलने,चळवळी, मोर्चे,धरणे,निवेदने झाली या प्रत्येक लढ्यात सहभागी असलेले चिरतरुण योद्धा म्हणजे कै. रामा शिंदोळकर, आजच्या तरुण वर्गाला लाजवेल अशी त्यांची निष्ठा आणि लढ्यातील सहभाग हा प्रेरणादायी आहेच त्याच बरोबर आपली आर्थिक परिस्थिती बेताची असूनही या लढयात मुंबईसह विविध भागात सहभाग दर्शवून सीमालढ्याशी बांधिलकी त्यांनी दाखवून दिली.
बेळगावसह सीमाभागात 2018 साली सीमालढ्यातील युवकांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची स्थापना झाली, युवा समितीच पहिल आंदोलन म्हणून महाराष्ट्र अधिवेशना दरम्यान मुंबई येथील आझाद मैदानावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते, या आंदोलनात शेकडो युवक व कार्यकर्ते उपस्थित होते, त्या मध्ये हिरीरीने भाग घेतलेला 80 वर्षांचा युवक योद्धा म्हणजे कै. रामा शिंदोळकर, रामा शिंदोळकर आणि आम्ही बेळगाववरून मुंबईला ट्रेन मधून प्रवास करत एकत्र पोहचलो हे आमचे भाग्य…..!
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापूर च्या वतीने आम्ही ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून *एक पत्र सीमाप्रश्नासाठी* या अभियाना अंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाखो पत्र पाठविण्याचा उपक्रम राबविला, या पत्रमोहिमेत वयाच्या 82 व्या वर्षी स्वतःच्या हस्ताक्षरात पत्र पाठविणारे सीमा सत्याग्रही म्हणजे कै. रामा शिंदोळकर…
तरुण वर्गाला लाजवेल असा त्यांचा सीमालढ्यातील सहभाग हा आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहेच, त्यांचं अधुर असलेलं सीमाप्रश्न सोडवणूकीच स्वप्न साकार करण्याची जबाबदारी व कर्तव्य आमचं आहे, सीमाप्रश्न सोडवून घेणं हीच त्यांना श्रद्धांजली…!अमर रहे…. अमर रहे….
रामा शिंदोळकर अमर रहे….
धनंजय रा. पाटील
(कार्याध्यक्ष म.ए.युवा समिती सीमाभाग)



