बेळगाव लाईव्ह :करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्था कोल्हापूरच्यावतीने सौंदत्ती श्री रेणुका देवी यात्रेसंदर्भातील विविध मागण्या व तक्रारींचे निवेदन आज गुरुवारी सौंदत्ती (जि. बेळगाव) येथील श्री रेणुका देवी मंदिराच्या अध्यक्षांना सादर करण्यात आले.
करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्था कोल्हापूरचे अध्यक्ष संदीप साळोखे, उपाध्यक्ष किरण मोरे, सचिव प्रशांत खाडे आणि कार्यकारी अध्यक्ष उदय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन सौंदत्ती श्री रेणुका देवी मंदिराच्या अध्यक्षांना सादर केले.
याप्रसंगी संस्थेचे संचालक संजय मांगलेकर, श्रीकांत कारंडे, सदाशिव संवतरी, सुरेश बिरंबोळे, बाबुराव पाटील, अनिल देवणे, राजीव जाधव, दिलीप परीट, शिवाजी देवकर, प्रशांत सुतार, अक्षय हांडे व विजय पाटील उपस्थित होते.
सौंदत्ती श्री रेणुका देवी यात्रा कमिटी सदर यात्रेच्या सांगतेची तारीख आणि वेळ जाहीर करण्यास दरवर्षी विलंब करते. यात्रेदरम्यान सौंदत्तीमध्ये वास्तव्य येणाऱ्या लोकांना पाणीपुरवठा केला जावा. यात्रेदरम्यान दिवे उपलब्ध करून दिले जावेत. बस गाड्यांच्या पार्किंगसंदर्भात नेहमी संभ्रम असतो.
शौचालय उपलब्ध करून दिली जावी. जोगनभावी आणि इनीकुंड या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जावी. दंगेखोर भक्तांच्या मंदिरातील प्रवेशास निर्बंध घातले जावेत. मंदिराची तीनही दारं भाविकांसाठी खुली ठेवली जावीत. भाविकांशी सहकार्य करण्याची सूचना पोलीस प्रशासनाला दिली जावी, अशा मागण्या व तक्रारी निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.


