बेळगाव लाईव्ह : सहकार क्षेत्रालाही आता रिसॉर्टच्या राजकारणाची लागण झाली आहे. बेळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने, मतदानाचा हक्क मिळालेल्या पीकेपीएसच्या ) संचालकांना सध्या ‘टूर’चे भाग्य लाभले आहे. गोव्यासह महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी हे पीकेपीएस सदस्य पर्यटनासाठी रवाना झाले आहेत.
डीसीसी बँकेच्या १६ जागांपैकी ९ संचालक आधीच बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित ७ जागांसाठी निवडणूक निश्चित झाली आहे. निपाणी, हुक्केरी, अथणी, रायबाग, रामदुर्ग, कित्तूर आणि बैलहोंगल येथे ही निवडणूक पार पडणार आहे.
जिल्हा बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी जारकीहोळी आणि कत्ती-सवदी गटांमध्ये मोठी चुरस सुरू आहे. अक्रॉस व्होटिंग (गटाबाहेर मतदान) होण्याची किंवा मतदारांना आकर्षित करण्याची भीती असल्याने मतदारांना अन्यत्र हलवण्यात आले आहे. १९ ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार थेट तेथूनच बेळगावमध्ये येणार आहेत.
मतदारांना ‘हायटेक टीटी’तून अन्य राज्यांमधील रिसॉर्ट्समध्ये हलवण्यात आले आहे. मतदार पूर्णपणे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली राहणार असून, रिसॉर्टमध्ये गेलेल्या मतदारांना मोबाईल वापरण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.




