बेळगाव लाईव्ह : एका विशिष्ट कृमींमुळे होणाऱ्या ‘नारू’ रोगाप्रमाणेच, ‘लाल पिवळ्या नारू’मुळे फैलावणारा संसर्ग बेळगावात पसरण्याची शक्यता आहे. अशा ‘लाल पिवळ्या नारूची’ नांगी वेळीच ठेचण्याची गरज आहे, असा सणसणीत टोला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी करवेच्या नारायण गौडाला लगावला आहे.
रविवारी बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या नारायण गौडा गटाने कन्नड दीक्षा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नारायण गौडाने पुन्हा महाराष्ट्र एकीकरण समितीवर आगपाखड करत प्रक्षोभक विधाने केली. यामुळे सीमाभागातील वातावरण बिघडण्याची शक्यता असतानाच, अशी विधाने करणाऱ्यांवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत मराठी भाषिक तीव्रपणे व्यक्त करत आहेत. दरम्यान, नारायण गौडाच्या या वक्तव्यावर युवा नेते शुभम शेळके यांनी चोख प्रत्युत्तर देत खरपूस समाचार घेतला आहे.
शुभम शेळके म्हणाले की, “लाल पिवळा नारू व्हायरस! हा संसर्ग दूषित विचारांमुळे पसरतो. हा संसर्ग पसरायचा नसेल, तर त्यावर तात्काळ इलाजाची गरज आहे. या ‘लाल पिवळ्या नारूवर’ इलाज करण्यासाठी ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ हेच एकमेव डॉक्टर आणि ‘स्वाभिमानाची मराठी लस’ हाच एकमेव इलाज आहे. ही लस प्रत्येकाने घेतल्यास ‘लाल पिवळा नारू व्हायरस’ फैलावणार नाही!”
“बेळगावमध्ये येऊन कुणीही वाट्टेल ते बरळल्यास किंवा कितीही दर्पोक्ती केल्यास बेळगावातील मराठी भाषिकांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही शांततेत, संयमाने आणि लोकशाहीच्या चौकटीत राहून आंदोलने केली आहेत. मात्र, तरीही प्रशासनाने मराठी माणसांवर अनेक खोटे गुन्हे, खोट्या तक्रारी दाखल केल्या. याउलट, बेळगावमध्ये येऊन अशा पद्धतीने प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या नारायण गौडावर प्रशासन कोणती कारवाई करणार आहे?” असा थेट प्रश्न बेळगावातील मराठी भाषिक प्रशासनाला विचारत आहेत.
नारायण गौडाने गरळ ओकून गेल्यानंतर मराठी भाषिक पुन्हा एकदा पेटून उठला आहे. सीमाभागातील प्रत्येक मराठी भाषिक १ नोव्हेंबरच्या काळ्या दिनाच्या फेरीत उदवेगाने सामील होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीला ७० वर्षे झाली असून, ‘आम्ही राज्याच्या विरोधात किंवा राज्यशासनाच्या विरोधात हे सगळं करत नसून “ज्या वेळी भाषावार प्रांत रचना झाली आणि बॉम्बे राज्याचा भाग असलेले बेळगाव अन्यायाने म्हैसूर/कर्नाटक समाविष्ट करण्यात आले, तेव्हापासून आम्ही हा दिवस निषेध दिवस म्हणून पाळतो आणि तो केंद्र सरकारच्या विरोधात करतो.
आम्ही आमच्या न्याय हक्कांसाठी लढतो, आम्ही कन्नड भाषेला किंवा कर्नाटक राज्याला कधीच विरोध केलेला नाही. राज्योत्सवाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही केंद्र सरकारला आमची लोकेच्छा दाखवण्यासाठी एक माध्यम म्हणून निषेध फेरी आयोजित करतो. लाखो मराठी भाषिक या फेरीत सामील होत असतात असे शेळके म्हणाले.
“सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशात प्रत्येकाला निदर्शने करण्याचा आणि आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे नमूद केले आहे. हा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. असे असताना, रक्तपाताची वक्तव्ये नारायण गौडाकडून केली जातात आणि तरीही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.” याबाबत शुभम शेळके यांनी प्रशासनाला जाब विचारला.
बेळगावमध्ये असे प्रकार असेच सुरू राहिल्यास मराठी भाषिक हे कदापि सहन करणार नाहीत, मराठी भाषिकांच्या संयमाचा बांध कधी फुटेल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे नारायण गौडावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्याच्या वक्तव्याचा प्रादुर्भाव स्थानिक नागरिकांवर होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशी विनंती शुभम शेळके यांनी बेळगाव प्रशासनाला केली आहे.
बेंगळुरूहून येऊन बेळगावमध्ये अशी वक्तव्ये करून येथील वातावरण बिघडवल्यास, मराठी भाषिकांच्या भावनांचा उद्रेक होतो. सीमाभागात याचे परिणाम दिसल्यास मात्र फक्त मराठी भाषिकांवर खोटे गुन्हे दाखल होतात आणि जाणीवपूर्वक कारवाई केली जाते. नारायण गौडाच्या अशा प्रक्षोभक वक्तव्यांवर प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही, यामुळे प्रशासनानेच जाणीवपूर्वक नारायण गौडाला बेळगावमध्ये बोलावले आहे की काय, अशी शंका आता मराठी भाषिक उपस्थित करू लागले आहेत, असेही शेळके म्हणाले.
कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली मराठी माणसांच्या आंदोलनांना रोख लावायचा आणि दुसरीकडे बेळगावात बाहेरून येऊन गरळ ओकून वातावरण बिघडविणाऱ्यांना अभय द्यायचे, हा कोणता न्याय आहे? उलट अशा ‘लाल पिवळ्या नारूमुळे’ बिघडणारे बेळगावचे वातावरण प्रशासनाने वेळीच थांबवावे आणि तातडीने कारवाई करावी, अशी ठाम मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आणि लाखो मराठी भाषिकांच्या वतीने शुभम शेळके यांनी प्रशासनाला केली आहे.



