बेळगाव लाईव्ह : कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्याविरोधात २५ सप्टेंबर रोजी परिषदेच्या सभेत भाजपने ठराव मंजूर करून त्यांच्या बदलीचे आदेश दिले. या निर्णयावर विरोधी पक्षातील काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा ठराव कोणत्या आधारावर मंजूर करण्यात आला, याचे स्पष्टीकरण मिळावे, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त शुभा.बी. यांच्याकडे निवेदन देऊन केली. याप्रकरणी कोणतीही चौकशी झाल्याशिवाय महसूल उपायुक्तांवर कारवाई करू नये, अशी मागणी विरोधी गटाने केली आहे.
विरोधी गटातील सदस्यांनी निवेदन देताना स्पष्ट केले की, महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्यावर सत्ताधारी गटाने चुकीचा आरोप केला आहे. उपायुक्तांविरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत, तरीही घाईगडबडीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
नगरसेवक रवी साळुंके यांनी ठाम भूमिका मांडताना सांगितले, कि “मागील महिन्यात झालेल्या सभेत सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी महसूल विभागाच्या अधिकारी रेश्मा तालिकोटी यांच्यावर जो आरोप केला आहे, तो वेगा हेल्मेट संदर्भात २००२ पासून सुरू आहे. यामध्ये केवळ रेश्मा तालिकोटी यांचा थेट संबंध नसून, इतर अधिकारी देखील आहेत. याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास आमचा पाठिंबा असेल. कायद्याच्या चौकटीत राहून कामकाज करण्यासंदर्भात पालिका आयुक्तांना आवाहन करण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली येऊन कोणतेही पाऊल उचलू नका, असे आवाहन आम्ही केले आहे.”
निवेदन स्वीकारल्यानंतर महापालिका आयुक्त शुभा.बी. म्हणाल्या, “उपायुक्तांविरुद्धचा ठराव हा एका मताच्या फरकाने खंडपीठाच्या सभेत मंजूर झाला आहे. यावर चौकशी झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. मात्र, हा निर्णय आमच्या स्तरावर नसून, तो शासनाच्या अखत्यारीतला आहे. यापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी या निर्णयाला आव्हान देत आंदोलनही केले होते. त्यांना ठरावाची प्रत मिळाल्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई करावी लागेल.”
‘खाऊकट्टा’ प्रकरणावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देणे टाळत त्या म्हणाल्या की, “या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही. ‘खाऊकट्टा’ संबंधित प्रकरणात आमचे वकील न्यायालयात जात आहेत आणि महानगरपालिका आपली बाजू मांडत आहे.” अधिकाऱ्यांनी वेळेचे पालन करून आपली जबाबदारी पूर्ण करावी आणि सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी केलेल्या आरोपांसंदर्भात शासनाच्या चौकशीनंतर सत्यता समोर येईल, असेही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.




