बेळगाव लाईव्ह : टिळकवाडीमधील तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाजवळील रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन नागरिकांना लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
टिळकवाडीमधील तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या आरपीडी कॉर्नर ते मच्छे उपचारपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ७२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, आठ दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, असे ठोस आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. गणेशोत्सव आणि दसरा उलटूनही रस्त्याचे काम सुरू न झाल्याने संतप्त नागरिकांनी न्यायासाठी पुन्हा उपोषण सुरू केले होते.
या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, अपघातांचे प्रमाण वाढले होते. वेळोवेळी आंदोलन करूनही उपयोग न झाल्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या सुस्त कारभाराविरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला होता.
गणेशोत्सवापूर्वी लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे दिवाळी तोंडावर असताना नागरिकांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले होते.
मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाची अंमलबजावणी त्वरित करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर विनायक गुंजटकर यांनी हे धरणे आंदोलन मागे घेतले. त्यामुळे टिळकवाडीतील नागरिकांना आता खराब रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासातून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



