बेळगाव लाईव्ह : परिवहन बेळगाव बस विभागाने अनगोळ गावाच्या बसफलकावर नाव बदलून “अनिगोल” असे लिहिले असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, या नावबदलासाठी कोणताही शासन निर्णय (GR) अथवा प्रशासनाचा आदेश आलेला नाही. तरीसुद्धा बस विभागाने आपल्याच पद्धतीने हा बदल केला आहे.
आज (३ ऑक्टोबर २०२५) रोजी कॅम्प परिसरातून घेतलेल्या छायाचित्रांमध्ये हा बदल स्पष्टपणे दिसला. हा बदल केवळ उच्चाराच्या कारणास्तव जबरदस्तीने करण्यात आला आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अनगोळ गावाचा इतिहास, नाव आणि ओळख कायम तशीच आहे. मात्र बस विभागाने जाणूनबुजून नाव बदलून अनिगोल केले आहे, ज्यामुळे बैलहोंगल तालुक्यातील अनिगोल गावाशी साम्य दिसते. हा प्रकार गावाच्या ओळखीशी छेडछाड करणारा ठरत आहे.
हा अनधिकृत बदल बैलहोंगल तालुक्यातील ‘अनिगोल’ गावाशी साम्य साधणारा असल्याने बेळगावमधील अनगोळ गावाच्या भौगोलिक ओळखीबद्दल गोंधळ निर्माण होत आहे.
प्रशासनाच्या या मनमानी कारभारावर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला असून, बस विभागाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देत, तातडीने बसफलकांवर मूळ ‘अनगोळ’ नाव पुन्हा लिहिण्याची मागणी जोर धरत आहे.


