बेळगाव लाईव्ह :इंडोनेशियातील जकार्ता येथे 10 ते 15 सप्टेंबर दरम्यान झालेल्या आशियाई ज्युनियर ज्युडो चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेमध्ये टीम इंडिया अर्थात भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी नोंदवताना एकूण 6 पदकांसह दोन विजेतेपदे हस्तगत केली आहेत.
सदर चॅम्पियनशिपमध्ये एकूण जगातील विविध 20 देशांमधील 350 हून अधिक ज्युडोका अर्थात ज्युडो खेळाडू सहभागी झाले होते. प्रशिक्षक रोहिणी पाटील, विवेक ठाकूर, गुनमणी आणि अमित विग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय पथकातील युवा ज्युडो खेळाडूंनी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले.
भारतासाठी पदक विजेते पुढील प्रमाणे आहेत. सुवर्ण पदक : 57 किलो -शाहीन, 63 किलो – हिमांशी टोकस. रौप्य पदक : 78 किलो – इश्रुप नारंग. कांस्य पदक : 63 किलो – लिंथोई, 70 किलो – तैबांगनबी, 78 किलोवरील – कंवरप्रीत कौर. याखेरीज महिला विभागात भारतीय खेळाडूंनी सर्वंकष पहिले उपविजेतेपद आणि पुरुष व महिला संयुक्त दुसरे उपविजेतेपद पटकावले.
या उल्लेखनीय यशासह भारताने आशियाई पातळीवर ज्युडोमध्ये आपली वाढती ताकद दाखवून दिली आहे. यामुळे देशाला अभिमानास्पद अशा या कामगिरीमुळे भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी मोठ्या आशा निर्माण झाल्या आहेत.



