बेळगाव लाईव्ह : आगामी जनगणतीची मोहीम लक्षात घेऊन बेळगाव जिल्ह्याचे येत्या 31 डिसेंबर 2025 पूर्वी विभाजन करून दोन नवीन जिल्ह्याची निर्मिती केली जावी, असा आग्रह राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी कर्नाटक राज्य सरकारकडे केला आहे.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. राज्यसभा सदस्य कडाडी म्हणाले की, येत्या 31 डिसेंबर पूर्वी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून दोन नवीन जिल्हे निर्माण केले जावेत अशी माझी सरकारकडे मागणी आहे.
कारण गेल्या एप्रिल 2023 पासून देशात जनगणतीच्या कामाला सुरुवात झाली असून त्या संदर्भात जनगणती खात्याकडून प्रत्येक राज्याला जनगणतीसंदर्भात आदेश देण्यात आला आहे. तसेच जनगणतीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी डिसेंबर 2025 पूर्वी राज्यांनी त्यांच्या अंतर्गत ज्या प्रदेशांमध्ये बदल करावयाचे आहेत ते त्यांनी करून घ्यावेत, असेही त्या आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.

राज्यात 2025 नंतर 2 वर्षे म्हणजे 2028 पर्यंत जनगणतीचे काम सुरू राहणार असल्यामुळे बेळगाव जिल्ह्याचे 31 डिसेंबरपूर्वी विभाजन होणे आवश्यक आहे. तेव्हा त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाची घोषणा करावी असा माझा आग्रह आहे.
यावेळी महाराष्ट्र -कर्नाटक बेळगाव सीमाप्रश्नासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना ती गोष्ट वेगळी आहे, असे कडाडी म्हणाले. बेळगाव जिल्ह्यात सध्या प्रशासकीय कारभारात इतकी समस्या निर्माण झाली आहे की तिचे निवारण होण्यासाठी आणि प्रशासकीय व्यवस्था चांगली राहण्यासाठी नव्या जिल्ह्यांच्या घोषणेची आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले.


