जागतिक पर्यावरण दिन जगभर साजरा होत आहे. लहान वयातच निसर्ग संरक्षणाचे धडे देणे आवश्यक असून एव्हाना झाडांचे महत्त्व लहान मुलांना देखील कळू लागले आहे. आज राखी पौर्णिमेच्या निमित्ताने बेळगावमधील दोन चिमुरड्यांनी प्रत्येकाला निसर्गसंरक्षणाचा आदर्श देत ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश दिला आहे.
रक्षाबंधन हा सण बहिण भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. दूर गावी असलेले बहिण भाऊ या राखी बंधनाच्या सणासाठी एकत्र येतात.
याच औचित्याने बेळगावमधील चिमुकले बहीण भाऊ सार्थक मंडोळकर व कुमुद मंडोळकर या दोघं भावंडांनी राखी पौर्णिमेचा सण साजरा करत एक अनोखा संदेश सर्वांना दिला आहे. वेगळ्या पद्धतीने सणाचे आचरण करत झाडे लावा झाडे जगवा असा संदेश या भावंडानी दिला आहे.
शाळेत निसर्ग संरक्षणाचे धडे दिले जातात. लहानपणापासूनच हा संदेश बालमनावर बिंबविला जातो. याच संदेशाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत सार्थक आणि कुमुद यांनी पर्यावरण पूरक असे रक्षाबंधन साजरे केले. सार्थक आणि कुमुद हि दोन्ही मुले शिवसुधा कंस्ट्रक्शनचे रोमा आणि सचिन मंडोळकर यांची अपत्ये आहेत.
गुरुवारी रक्षाबंधनाच्या दिवशी शहरातील एका भावाने एका बहिणीला भेट म्हणून रोप देऊन पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून वाचवण्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





