बेळगांव शहरात खच्चून भरलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगांव टॉकीज या संस्थेतर्फे फक्त बेळगांवकरांसाठी येत्या 11 डिसेंबर सायंकाळी 7 वाजल्यापासून पुढील 70 तासात 5 मिनिटाची अतरंगी शॉर्ट फिल्म अर्थात लघुपट बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
बेळगांव शहरात असे अनेक नागरिक आणि युवक-युवती आहेत की ज्यांच्या डोक्यात कायम अतरंगी विचार घोळत असतात. त्यांच्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले आहे. समाजहिताच्या आणि मनोरंजक अशा कल्पना प्रत्यक्ष पडद्यावर साकारल्या जाव्यात या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी आयोजक बेळगांव टॉकीज यांच्याकडून एक विषय दिला जाणार असून त्यावर स्पर्धकांना 5 मिनिटांचा लघुपट बनवायचा आहे. यासाठी स्पर्धकांना येत्या 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून 14 डिसेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा वेळ दिला जाणार आहे.
हा लघुपट बनवताना दुसऱ्या एखाद्या चित्रपटाची नक्कल करता येणार नाही. लघुपट नवनिर्मित मूळचा असावा आणि मूळ संगीतकारांनाच त्यांचे योग्य श्रेय दिले जावे. स्पर्धक आपला लघुपट कोणत्याही भाषेत बनवू शकतात, फक्त सबटायटल्स अर्थात उपशीर्षकं इंग्रजीमध्ये देणे आवश्यक आहे.
सर्वोत्तम लघुपट बनविणाऱ्या यशस्वी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी संबंधित लघुपट पाठवला जाणार आहे. तरी हौशी स्पर्धकांनी या स्पर्धेचा बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
लिंक मध्ये या बातमीचा फॉर्म आहे तो खाली भरू शकता
https://www.savbisff.com/belgaum-talkies



