बेळगाव बार असोसिएशनतर्फे वकिलांच्या सहाय्य करणाऱ्या ज्युनियर वकिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून मंगळवारी 157 सहाय्यक वकिलांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉक डाऊन यामुळे वकिलांना सहाय्य करणाऱ्या जुनियर मंडळी देखिल अडचणीत आले आहेत. न्यायालय बंद असल्यामुळे वकिली व्यवसाय ठप्प झाला आहे. परिणामी वकिलांना सहाय्य करणाऱ्या ज्युनिअर वकिलांचे अर्थात सहाय्यकांचे अर्थांजनाचे साधन बंद झाले आहे. तेव्हा त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे पोटापाण्याचे हाल होऊ नयेत यासाठी मंगळवारी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. ए. जी. मुळवाडमठ यांच्या नेतृत्वाखाली शहर परिसरातील 157 ज्युनिअर वकिलांना अर्थात वकिलांच्या सहाय्यकांना सुमारे 2 हजार रूपये किंमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
बेळगाव न्यायालय आवारातील विटनेस लॉन्ज इमारतीमध्ये मंगळवारी हा जीवनावश्यक वस्तू वितरण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. ए. जी. मुळवाडमठ, उपाध्यक्ष अॅड. चंद्रकांत मजगी, अॅड. आर. सी. पाटील, अॅड. गजानन पाटील, अॅड. शिवपुत्र फटकळ, अॅड. आर. के. पाटील, अॅड. प्रभू यतनट्टी, अॅड. नितीन सोलकाण पाटील, अॅड. माविनकट्टी आदी बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तू वाटपाप्रसंगी सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करण्यात आले.
वकिलांच्या सहाय्यकांना वितरित करण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये 10 किलो तांदूळ, 10 किलो आटा, बटाटे, साखर, डाळ, साबण, चहा पावडर, मेणबत्या, माचिस आदी वस्तूंचा समावेश आहे. आता लॉक डाऊनचा कालावधी समाप्त होईपर्यंत बेळगाव न्यायालय आवारातील विटनेस लॉन्ज इमारतीमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भात पोलीस खात्याला कल्पना देण्यात आली असून वकिलाच्या पोशाखातील लोकांना पोलिसांनी अडवू नये, अशी विनंती केली असल्याचे अध्यक्ष अॅड. ए. जी. मुळवाडमठ यांनी “बेळगाव लाईव्ह”ला सांगितले.




