belgaum

हा नाला ताबडतोब स्वच्छ करण्याची मागणी

0
729
 belgaum

बेळगाव लाईव्ह :पावसाळ्यातील पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सांबरा (ता जि. बेळगाव) येथील महादेवनगर परिसरातील दुर्लक्षित नाला व गटार स्वच्छतेचे काम पंचायतीने युद्धपातळीवर हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे.

सांबरा ग्रामपंचायतचे गावातील महादेवनगर परिसरात असलेला नाला आणि तेथील गटारीच्या स्वच्छतेकडे अलीकडच्या काळात साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढण्याबरोबरच गाळ केरकचरा भरलेल्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या इतर टाकाऊ साहित्य वगैरेंमुळे सांडपाण्याचा निचरा न होता हा नाला सतत तुंबलेला असतो.

या खेरीज सध्या सांबरा विमानतळ विस्तारीकरणाचे काम सुरू असून तेथे खोदकाम व बांधकाम सुरू आहे. त्यामुळे जोराचा मुसळधार पाऊस झाल्यास विमानतळा कडील संपूर्ण पाणी थेट महादेवनगरच्या नाल्याला येऊन मिळते.

 belgaum

यात भर म्हणून अलीकडे बागेवाडी रस्त्याकडील पावसाचे पाणी देखील याच नाल्यात येत असते. अशावेळी झाडेझुडपे व मोठ्या प्रमाणातील गाळ -केरकचऱ्यामुळे नाल्याची स्थिती पूर सदृश्य होत असून जी आज पहावयास मिळाली.

जोरदार पावसाने आज दुपारनंतर जवळपास तासभर सांबरा गावाला झोडपून काढले. परिणामी कांही ठिकाणी नाल्यातील पावसाचे पाणी पात्राबाहेर येऊन ठिकठिकाणी पाण्याची तळी निर्माण झाली होती. या परिस्थितीला सांबरा ग्रामपंचायतचे सदर नाल्याच्या स्वच्छतेकडे झालेले दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

एकंदर आजच्या पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता सदर नाल्याची युद्धपातळीवर साफसफाई होणे आवश्यक असून जर तसे झाले नाही तर येत्या पावसाळ्यात या नाल्याला पूर येऊन तो फुटण्याचा धोका नाकारता येत नाही. जर तसे घडले तर विशेष करून महादेवनगर पहिली गल्ली पूरग्रस्त होऊन नागरिकांचे हाल होण्याचा संभव आहे.

ही झाली पावसाच्या पाण्याची गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे सदर परिसरात पिण्यायोग्य शुद्ध पाण्याच्या सुमारे 25 -30 विहिरी आहेत. या विहिरी स्वच्छते अभावी नाला तुंबून राहण्याच्या समस्येमुळे दूषित होण्याचा धोका आहे. तेंव्हा सांबरा ग्रामपंचायतने याची गांभीर्याने दखल घेऊन महादेवनगर येथील नाल्याची युद्धपातळीवर स्वच्छता करून येत्या पावसाळ्यात स्थानिक रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.