belgaum

बेळगावात जय भवानी जय शिवाजीचा जयघोष..

0
44
 belgaum

बेळगाव लाईव्ह :परंपरेनुसार बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात मध्यवर्तीय सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ बेळगावतर्फे आज शहापूर येथील छ. शिवाजी उद्यानामध्ये शिवरायांच्या मूर्तीचे पूजन व अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात भक्तीभावाने साजरी करण्यात आली.

श्री शिवजयंतीनिमित्त विविध गड किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतींचे आज रविवारी सकाळी धर्मवीर संभाजी चौक येथे स्वागत केल्यानंतर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे शहापूर येथील छ. शिवाजी उद्यानामध्ये शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्यानातील शिवरायांच्या सिंहासनारूढ मूर्तीला अभिषेक घालण्याबरोबरच पुष्पहार घालून विधिवत पूजन करण्यात आले.

त्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, भाजप नेते शंकरगौडा पाटील, किरण जाधव, ॲड. मुरुगेंद्रगौडा पाटील आदी मान्यवरांनी मूर्तीला पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणांनी उपस्थित आणि उद्यान परिसर दणाणून सोडला होता.

 belgaum

कार्यक्रमास माजी नगरसेवक नेताजी जाधव, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, पोलीस उपायुक्त नारायण बरमनी, रमेश पावले, विकास कलघटगी आदींसह मध्यवर्तीय सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळाचे पदाधिकारी सदस्य भाजप पदाधिकारी सदस्य, बालगोपाळ आणि बहुसंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.

बेळगाव शहरातील श्री शिवजयंती उत्सवाला प्रारंभ झाला आहे. यानिमित्त विविध गड किल्ल्यांवरून आणण्यात आलेल्या शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नरगुंदकर भावे चौकातील मंडपातील महाराजांच्या मूर्तीचे आणि आता छ. शिवाजी उद्यानातील महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचा रंग जीर्ण झाल्यामुळे मध्यवर्तीय महामंडळाच्या माध्यमातून तिचे रंगकाम हाती घेऊन पूर्ण करण्यात आले आहे या रंगकामासाठीचा सर्व खर्च रमाकांत दादा कोंडुसकर यांनी उचलला आहे.

बेळगावातील शिवजयंती उत्सवाला आज प्रारंभ झाला असून तीन दिवसांनी म्हणजे 21 एप्रिल रोजी चित्ररथ मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार आहे. मिरवणुकीतील 60 ते 70 चित्ररथांवरील सजीव देखाव्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास भावी पिढी समोर सादर केला जाणार आहे. अशी माहिती देऊन तरी ही मिरवणूक शिस्तीने शांततापूर्वक पार पडावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी महामंडळाच्यावतीने करण्यात आले. यावेळी बोलताना श्री शिवजयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी प्रथम डॉ आंबेडकर जयंती, श्री शिवजयंती व श्री बसव जयंतीच्या शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या. परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे चित्ररथ मिरवणुकीमध्ये शिवकालीन पराक्रमाचा इतिहास दाखवण्याचे कार्य सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळांनी करावे.

तसेच मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांनी असभ्यवर्तन करू नये आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत या पद्धतीचे देखावे सादर करावेत, असे आवाहन कोंडुसकर यांनी केले. मिरवणुकी दरम्यान आपले समाज बांधव -भगिनी मोठ्या संख्येने रस्त्यावर असतात. त्यांची सुरक्षितता महत्वाची असल्यामुळे शिवभक्त या नात्याने प्रत्येकाने शिवरायांच्या आचार विचारांचे आचरण करणे कर्तव्याचे आहे.

येत्या काळात मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे बेळगाव शहर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सार्वजनिक मूर्तींसाठी आवश्यक मदत केली जाईल असे जाहीर करण्याबरोबर काही राजकीय व्यक्ती देणगी वगैरे आमिष दाखवून आपल्या श्री शिवजयंती मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या आमिषाला शिवभक्तांनी बळी पडू नये, अशी विनंती देखील रमाकांत कोंडुसकर यांनी शेवटी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.