बेळगाव लाईव्ह : खादरवाडी क्रॉस, उद्यमबाग येथील एका घरफोडी प्रकरणाचा छडा लावताना उद्यमबाग पोलिसांनी दोघा चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या जवळील रोख रक्कम, सोन्याचा दागिना, मोबाईल फोन, चार चाकी व दुचाकी वाहने असा सुमारे 4 लाख 59 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे रामचंद्र फकीरप्पा तळवार वय 21 रा. मोहरे, देशनूर नजीक ता. बैलहोंगल जि. बेळगाव) आणि सुरेश लक्कप्पा पाटील वय 33, मुळ रा. राजनकट्टी ता. गोकाक जि. बेळगाव, सध्या -बसवार कैपाने रंगदोळी, वाघवडे रोड ता. बेळगाव) अशी आहेत.
प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, खादरवाडी क्रॉस उद्यमबाग येथील शकिना बारच्या मागील बाजूस राहणाऱ्या विजय हनुमंत अंदाणी यांनी गेल्या 8 मार्च 2026 रोजी आपल्या घरात चोरी झाल्याची तक्रार उद्यमबाग पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यात आल्यानंतर खडेबाजार उपविभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त शेखरप्पा हेजे यांचे मार्गदर्शन आणि उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील त्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तपास कार्य हाती घेऊन उपरोक्त दोघ आरोपींना ताब्यात घेतले.
त्यावेळी पोलीस चौकशीत आरोपींनी आपण उद्यमबाग आणि मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या जवळील 0.300 ग्रॅम वजनाचा 10,000 रुपये किमतीचा एक सोन्याचा दागिना, रोख 60,000 रुपये, 2,00,000 रुपये किमतीची टाटा कंपनीची कार (क्र. केए 22 पी 1301), टीव्हीएस कंपनीची 1,00,000 रुपये किमतीची रायडर मोटरसायकल,
80,000 रुपये किमतीची स्प्लेंटर मोटरसायकल (क्र. केए 22 एचक्यू 5110), व्हीवो कंपनीचा 8000 रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि जिओ भारत कंपनीचा 1000 रुपये किमतीचा कीपॅड मोबाईल असा एकूण 4,59,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.





