belgaum

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला 20 वर्षे सक्तमजुरी

0
216
Conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह :लग्नाची आमिष दाखवण्यासह अपहरण करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुडलगी (जि. बेळगाव) तालुक्यातील एका युवकाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, विशेष जलदगती पोक्सो न्यायालय -01 बेळगावच्या न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी 20 वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेसह 10,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

सश्रम करावासाची शिक्षा झालेल्या युवकाचे नांव देवराज अशोक मेत्री (वय 28, रा. हुन्शाळ पीवाय, ता. मुडलगी, जि. बेळगाव) असे आहे. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादीने कुलगोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असून देखील पीडित मुलीची शिकवणी घेण्यास येणाऱ्या आरोपीचे दोन वर्षापासून तिच्यावर प्रेम जडले होते. यातूनच त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले तसेच तिचे अपहरण करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले.

सदर प्रकार त्या मुलीने आपल्या घरच्यांना सांगताच त्यांनी आरोपी विरुद्ध कुलगोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान बेंगलोरला पळून गेलेला आरोपी गेल्या 17 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या गावी परत येत असताना कौजलगी गावामध्ये कुलगोड पोलिसांनी त्याला अटक केली. तसेच त्याच्या विरुद्ध साक्षीपुरावे गोळा करून बेळगावचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, विशेष जलदगती पोक्सो न्यायालय -01 मध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते.

 belgaum

या खटल्याची आज अंतिम सुनावणी होऊन न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी एकूण 9 साक्षीदारांच्या साक्ष, 14 कागदोपत्री पुरावे आणि 13 मुद्देमाल ग्राह्य मानून आरोपी देवराज अशोक मेत्री याला 20 वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेसह 10,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.

त्याचप्रमाणे नुकसान भरपाई दाखल जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाला पीडित मुलीच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये 4 लाख रुपयांची कायम ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. या खटल्यात सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील ॲड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.