बेळगाव लाईव्ह :राज्यात 1995 पासून प्रारंभ झालेल्या कन्नड माध्यमाच्या विनाअनुदानित शाळा, कॉलेजेसना अनुदानित करण्याबरोबरच सरकारच्या पुरवणी अर्थसंकल्पात या शिक्षण संस्थामधील शिक्षक, प्राध्यापकांच्या हिताच्या दृष्टीने 341 कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी कर्नाटक विनाअनुदानित शाळा कॉलेजेस कर्मचारी संघटना आणि संबंधित विविध संघटनांनी भव्य मोर्चाद्वारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे.
कर्नाटक विनाअनुदानित शाळा कॉलेजेस कर्मचारी संघटना आणि संबंधित विविध संघटनांतर्फे उपरोक्त मागणीसाठी आज गुरुवारी सकाळी बेळगाव शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील कन्नड माध्यमाच्या विनाअनुदानित शाळा, कॉलेजेसच्या शिक्षक, शिक्षिका आणि प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला होता.
आपल्या मागण्यांची पूर्तता करावी या मागणी संदर्भात घोषणा देत निघालेला हा मोर्चा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात या मोर्चाची सांगता होऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात प्रसिद्धी माध्यमांना आपल्या मागणी संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना बोरगावच्या विद्यासागर शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक राजू कुमार खिचडे यांनी सांगितले की, गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून आम्ही आमच्या संस्थेला अनुदान मिळावे त्यानुसार शिक्षकांना पगार मिळावा यासाठी आंदोलन करत आहोत सध्या आमची परिस्थिती ‘बिनपगारी फुल्ल अधिकारी’ अशी झाली आहे.

गेली अनेक वर्ष आम्ही मुलांना ज्ञानदान करत आहोत मात्र त्याचा योग्य परतावा मिळण्याऐवजी आमच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे माझी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विनंती आहे की तुम्ही अनेक लोकोपयोगी योजनांचे ‘सरदार’ झाले आहात. तेव्हा आज काळाची गरज आहे की तुम्ही शिक्षकांच्या भाग्याचे ‘सरदार’ व्हावयास हवे. तेंव्हा आमची विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये तुम्ही आमच्या विनाअनुदानित संस्थांना अनुदान मंजूर करावे.
त्याचप्रमाणे सरकारने 1800 कोटी रुपये शिल्लक ठेवले आहेत. त्यापैकी इतर क्षेत्रांसाठी जे वाटप करायचे असेल ते करा मात्र 341 कोटी रुपयांचे अनुदान आम्हा शिक्षकांसाठी द्यावे. जर आमच्या या मागणीची पूर्तता झाली नाही तर आम्ही सर्व शिक्षक आमच्या मुलाबाळांसह शाळेतील मुलं, त्यांचे पालक यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा मुख्याध्यापक खिचडी यांनी दिला.





