belgaum

बेळगावच्या उड्डाणपूल प्रकल्पाला गती : वृक्ष नकाशांकन झाले सुरू

0
1476
Fly overs
File pic: Fly overs
 belgaum

बेळगाव लाईव्ह :वाढत्या वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाय म्हणून संकल्पित केलेला बेळगाव शहरातील पहिला उड्डाणपूल प्रकल्प आता अधिक प्रगत तयारीच्या टप्प्यात जात असून जमिनीवरील एका महत्त्वाच्या घडामोडीत किल्ला तलाव परिसरातील सम्राट अशोक चौक आणि कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल दरम्यानच्या महत्त्वाच्या पट्ट्यातील झाडांना क्रमांक देऊन त्यांचे नुकतेच नकाशांकन करण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम खाते (पीडब्ल्यूडी) आणि वन खाते यांनी संयुक्तपणे गेल्या सोमवारी पार पाडलेली ही वृक्ष नकाशांकन प्रक्रिया भूसंपादन आणि रस्ता रुंदीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पूर्वतयारी आहे. झाडांच्या नकाशांकनावरून असे दिसून येते की प्रकल्पाची पूर्वतयारी वेगाने होत आहे आणि नियोजनाचे प्रत्यक्ष अंमलबजावणीत रूपांतर जवळ येत आहे. प्रस्तावित उड्डाणपूल, जो बेळगावचा या पद्धतीचा पहिलाच पूल असेल.

हा पूल शहरातील काही सर्वाधिक वर्दळीच्या चौकांमधील वाहतूक सुव्यवस्थित करण्यासाठी 4.5 कि.मी. लांबीचा उन्नत मार्ग म्हणून नियोजित आहे. हा मार्ग गांधीनगरमधील संकम हॉटेलजवळ राष्ट्रीय महामार्ग-48 पासून सुरू होऊन अशोक सर्कल, संगोळ्ळी रायण्णा (आरटीओ) सर्कल मार्गे कित्तूर राणी चन्नम्मा सर्कलपर्यंत विस्तारून अखेरीस छत्रपती धर्मवीर संभाजी चौकात येथे संपेल.

 belgaum

तिथून हा मार्ग केएलई हॉस्पिटलच्या पुढे डॉ. आंबेडकर रोड मार्गे जाऊन अखेरीस आयसीएमआरजवळ राष्ट्रीय महामार्गाला पुन्हा जोडला जाईल. हा मार्ग सध्या सर्वाधिक गर्दीचे मार्ग असलेल्या सम्राट अशोक चौक आणि छत्रपती धर्मवीर संभाजी चौक यांसारख्या शहरातील प्रमुख भागांमधून जातो.

सध्याच्या योजनेनुसार : प्रमुख संरचनात्मक तपशील
प्रकल्पाच्या आराखड्यातून समोर आलेल्या नवीन तपशिलांवरून त्याचा आवाका आणि त्यातील अभियांत्रिकी गुंतागुंत पुढील प्रमाणे दिसून येते : सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत 167 खांबांवर (पिलर्स) आधारित 6,678 मीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधला जाईल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत (एनएचएआय) 22 खांबांवर उभारला जाणारा अतिरिक्त 1,112 मीटरचा एक भाग हाती घेतला जाईल. एकत्रितपणे, हे भाग मिळून अनेक चौकांमधील वाहतूक सुव्यवस्थित करणारा एक प्रमुख उन्नत मार्ग तयार होणार आहे. या उड्डाणपुलावर मोठ्या संख्येने खांबांच्या आधाराने अनेक स्पॅन असणार असून त्याचे वेगवेगळे टप्पे सार्वजनिक बांधकाम विभाग व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

उड्डाण पूला खालून वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी अशोक सर्कल आणि चन्नम्मा सर्कलसारख्या प्रमुख चौकांमध्ये रोटरी अर्थात रुंद रस्त्याचे वर्तुळाकार चौक प्रस्तावित आहेत. मध्यवर्ती बस स्थानक, आरटीओ, महंतेशनगर आणि कोल्हापूर सर्कल यांना जोडणारे अनेक प्रवेश आणि निर्गमन रॅम्प अर्थात प्रवणमार्गही नियोजित आहेत. याखेरीज सांबरा विमानतळाकडे संपर्क सुधारण्यासाठी रोड ओव्हर ब्रिजसह (आरओबी) एक समर्पित सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) देखील प्रस्तावित आहे. उड्डाणपुलाच्या आराखड्याला जिल्हा प्रशासनाकडून तत्त्वतः मंजुरी मिळाली असून, संरेखन नकाशा प्रसिद्ध करण्यात आला असून जो आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

सध्याच्या प्रगतीनुसार, जर मंजुरी आणि निविदा प्रक्रिया विनाविलंब पार पडल्या, तर पुढील 6 महिने किंवा वर्षभरात उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू होऊ शकते. प्रकल्पाचा आवाका आणि गुंतागुंत लक्षात घेता, बांधकाम टप्प्याला सुमारे 3 ते 4 वर्षे लागण्याची शक्यता आहे.

काम सुरू झाल्यानंतर दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल असे पूर्वी म्हंटले जात असले तरी, तज्ञांच्या मते भूसंपादन, सुविधांचे स्थलांतर आणि दाट शहरी भागांमधील टप्प्याटप्प्याने होणारे बांधकाम या बाबी विचारात घेतल्यास या मोठ्या प्रकल्पासाठी लागणारा वास्तविक कालावधी सुमारे 3 वर्षांपर्यंत वाढू शकतो.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.