बेळगाव लाईव्ह विशेष:
बेळगाव शहरातील १८ गल्ल्यांपैकी एक अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक देवस्थान म्हणजे कांगली गल्ली येथील श्री होळी कामण्णा देवस्थान. प्रत्येक देवस्थानाची स्वतःची एक कथा, वैशिष्ट्य आणि प्रथा असते, आणि या ठिकाणाची होळी ही संपूर्ण शहराची “मानाची होळी” म्हणून ओळखली जाते.
या जागृत देवस्थानाची खासियत म्हणजे वर्षभर येथे नारळ वाढवले जात नाहीत. फक्त होलिकोत्सवाच्या पाचव्या दिवशी नारळ वाढवले जातात. त्या काळात जमा केलेल्या नारळांचा उपयोग मोठ्या तोरणासाठी केला जातो आणि लोकांना प्रसाद वाटप केला जातो. नवसपूर्तीसाठी लोक या ठिकाणी शेकडो नारळ जमा करतात, आणि होळीच्या पाचव्या दिवशी नारळ फोडून प्रसाद वितरीत केला जातो.
पूर्वी बेळगाव शहर फक्त १८ गल्ल्यांपुरते मर्यादित होते. त्या काळी कांगली गल्लीची होळी “मानाची होळी” म्हणून समजली जात असे, आणि ही होळी पेटवल्यानंतरच शहरातील इतर होळ्या सुरू केल्या जात. या प्रथेनुसार दोन होळी आणल्या जातात – एक कांगली गल्लीची आणि दुसरी कपलेश्वर मंदिराची लहान होळी.
कथा अशी सांगितली जाते की, फार वर्षांपूर्वी होळी चढवताना हुबळकर घराण्याचा एक लहान मुलगा अचानक हरवला. तो मागील खड्ड्यामध्ये आढळून आला, आणि त्या वेळेस देवीने त्याच्या अंगात येऊन आपले बाळ असल्याचे सांगितले. त्यानंतर येथे श्री होळी कामण्णा आणि ईर अशी दोन पूजास्थाने निर्माण झाली. आजही पाटील आणि हुबळकर घराण्यांना या पूजेत विशेष मान आहे.

सालाबाद प्रमाणे, यंदादेखील नारळ फोडून ही पारंपरिक प्रथा जपली जात आहे, आणि बेळगावकर या दिवशी उत्साहाने होळी साजरी करतात.
हेमू कलानी चौक परिसरात असलेले श्री दत्त साई मंदिर आणि दर गुरुवारी तिथ होणारा महाप्रसाद, तसेच बेळगाव शहरात प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले शनी मंदिर व नवरात्रीत होणारा बेळगावच्या नारायणी देवीचा जल्लोषी उत्सव, हे सर्व ठिकाणे या भागाला धार्मिक महत्त्व प्रदान करतात.
त्यातच प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा आणि देवस्थानाची महिमा यामुळे कांगली गल्ली–हेमू कलानी चौक परिसर हळूहळू धार्मिक चौक म्हणून अधोरेखित होऊ लागला आहे.





