बेळगाव लाईव्ह :कणेरी (जि. कोल्हापूर, महाराष्ट्र) येथील श्री सिद्धगिरी मठातर्फे येत्या मंगळवार दि 31 मार्च ते शनिवार दि 4 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये भव्य अशा हस्तकला प्रदर्शन वजा मेळाव्याचे (महाकुंभ) आयोजन करण्यात आले आहे.
बेळगाव शहरांमध्ये आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपरोक्त माहिती देण्यात आली. कणेरी मठ अर्थात श्री सिद्धगिरी मठाचे प.पू. श्री सिद्धेश्वर स्वामीजी हे 99.99 टक्के जनकल्याणासाठी आपल्याकडून अजून काय होईल? याच्याच धडपडीत असतात. त्या अनुषंगाने यावेळी महाराष्ट्र सरकारचा पर्यटन विभाग आणि श्री सिद्धगिरी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 31 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत भव्य हस्तकला प्रदर्शन वजा मेळाव्याचे आयोजन केले जात आहे.
भारतीय संस्कृतीतील विणकाम, पाककला, मडकी बनवणे (कुंभार काम), माती व धातूचे हंडे बनवणे, आपापल्या भागातील वाद्य निर्मिती, वेगवेगळ्या प्रकारच्या घोंगड्या बनवणे हे हस्तकौशल्य ज्या ठिकाणी सर्वोत्तम आढळून येते त्या त्या ठिकाणच्या एकूण सुमारे 200 मातब्बर कारागिरांचा या मेळाव्यामध्ये सहभाग असणार आहे.
आपल्या पारंपारिक जुन्या हस्तकलांमध्ये आजच्या आधुनिक युगात काय बदल घडले आहेत, किती प्रगती झाली आहे आणि किती होऊ शकते हे या मेळाव्याच्या माध्यमातून पहावयास मिळणार आहे. आजच्या युवा पिढीसाठी हा मेळावा अतिशय फायद्याचा असून युवक-युवतींनी या मेळाव्याला भेट दिल्यास त्यांना आपण कशाप्रकारे एखादा उद्योग सुरू करू शकतो, याची कल्पना येऊ शकेल.
तसेच मेळाव्यात सहभागी कारागीर आणि उपस्थित ज्येष्ठ अनुभवी मंडळींकडून मार्गदर्शन घेऊ शकतात. थोडक्यात हा मेळावा म्हणजे युवा पिढी करिता निरीक्षण करून शिकण्यासाठी एक मोठे व्यासपीठ असणार आहे असे सांगून मेळाव्याच्या ठिकाणी विविध व्यंजनं, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील असणार आहेत अशी माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.





