belgaum

कलखांबच्या राहुल पाटीलची यूपीएससीत पुन्हा झेप; मिळवला 224 रँक

0
1780
 belgaum

बेळगाव लाईव्ह :
बेळगाव तालुक्यातील कलखांब गावच्या सुपुत्राने कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर पुन्हा एकदा केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) कठीण परीक्षा उत्तीर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कलखांबचा राहुल जयवंत पाटील याने यूपीएससी परीक्षेत 224 वा क्रमांक मिळवत मोठी झेप घेतली असून यामुळे त्याला आयएएस किंवा आयपीएस सेवा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राहुल पाटील याने यापूर्वीही यूपीएससी परीक्षेत यश मिळवले होते. 2024 साली झालेल्या परीक्षेत त्याने चौथ्या प्रयत्नात 804 वा क्रमांक मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्या वेळी त्याला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (IFS) मिळाली होती आणि त्याने आसाम येथे प्रशिक्षणही घेतले होते. मात्र इथेच न थांबता अधिक चांगला क्रमांक मिळवण्याच्या ध्येयाने राहुलने पुन्हा तयारी सुरू ठेवली आणि पाचव्या प्रयत्नात 224 वा रँक मिळवत मोठे यश मिळवले.

राहुलचे शालेय शिक्षण बेळगाव येथील वनिता विद्यालय इंग्लिश मीडियममध्ये झाले. त्यानंतर त्याने आरएलएस महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले. गुणवत्तेच्या जोरावर त्याला बेंगळुरू येथील आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळाला आणि तेथून त्याने बीईपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

 belgaum


अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर राहुलने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाच्या बळावर त्याने दोनदा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत 224 व्या क्रमांकापर्यंत झेप घेतली आहे.
राहुलचे आई-वडील शेती करतात, तर वडिलांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय देखील आहे. साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या राहुलने देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


बेळगाव तालुक्यातील कलखांब गावासह संपूर्ण परिसरात राहुलच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला जात असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.